Pimpri : वराहपालन करणाऱ्यांनो, सात दिवसांच्या आत डुकरे महापालिका हद्दीबाहेर घालवा अन्यथा….

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये वराहपालन करणाऱ्या मालकांनी आपापली डुकरे पालिका हद्दीबाहेर सोडावीत अन्यथा अन्यथा संबंधित मालकांवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये डुकरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सोमवारी शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी एक जिवंत डुक्कर पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्या पालिका मुख्यालयातील कार्यालयात आणून सोडले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने त्वरित प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

वराहपालन करणाऱ्या मालकांनी आपली डुकरे मनपा हद्दीच्या बाहेर सात दिवसांच्या आत त्वरित हलवावीत अन्यथा संबंधित मालकांवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशारा या प्रसिद्धिपत्रकामधून देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे महापालिकेच्या स्वछताविषयक तरतुदीनुसार या डुकरांना अटकाव करून ती नष्ट करण्यात येतील तसेच डुकरांच्या प्रेतांची विल्हेवाट महापालिकेमार्फत लावली जाईल. डुकराबद्दलच्या नुकसानभरपाई बाबत दावा दाखल करता येणार नाही असे महापालिकेने कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.