Pimpri: पालिका मुख्यालयासमोरील जागा पीएमपीएमएलला देणार

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात असलेल्या 2100 बस उभ्या करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरील मोकळी जागा डेपो व बस स्थानकासाठी देण्यात येणार आहे. ही जागा 30 वर्षासाठी दिली जाणार असून याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली.

पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुमारे 2 हजार 100 बस आहेत. त्याचबरोबर ताफ्यामध्ये नव्याने आणखी बस दाखल होणार आहेत. या सर्व बस पार्कींगसाठी पीएमपीएमएलकडील जागा कमी पडत आहे. त्यामुळे शेकडो बस रस्त्यावर पार्क कराव्या लागत आहेत. सार्वजनिक सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून सर्व बसचे पार्कींग संरक्षित जागेवर होणे आवश्‍यक आहे. या बससाठी जागेची आवश्‍यकता आहे.

त्यासाठी पीएमपीएमएलने पिंपरी महापालिकेकडे अनेक मोकळ्या जागांची मागणी केली आहे. महापालिका भवनासमोरील आरक्षण क्रमांक 116 येथील 0.79 पैकी 0.73 हेक्टर जागा बस डेपोसाठी आरक्षित आहे. या जागेची पीएमपीएलने महापालिकेकडे मागणी केली आहे. त्या जागेचा वापर पीएमपीएमएल बस पार्कींग, डेपो किंवा बस स्थानकासाठी करणार आहे. 30 वर्षासाठी पीएमपीएमएलने ही जागा मागितली आहे. कायदा, नगररचना विभागाच्या अभिप्राय, अटी व शर्तीस अधीन राहून पीएमपीएमएलला जागा देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.