Pimpri: महापालिकेच्या तिजोरीत 302 कोटीचा महसूल

एमपीसी न्यूज – चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यात मालमत्ता करातून 302.78 कोटी रुपयांचा महसूल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोषागरात जमा झाला आहे. 22 नोव्हेंबर 2018 अखेर दोन लाख 45 हजार 650 मिळकतधारकांनी कराचा भरणा केला असून त्यामध्ये सर्वाधिक एक लाख 23 हजार 54 मिळकत धारकांनी 151. 28 कोटी रुपयांचा कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त व कर संकलन विभागाचे प्रमुख दिलीप गावडे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात सव्वा चार लाखांच्या आसपास मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. मिळकत भरण्यासाठी पालिकेने 16 ठिकाणी सोय उपलब्ध करुन दिली आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, पालिका भवन, फुगेवाडी, भोसरी, च-होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे आणि दिघी बोपखेल या ठिकाणी मिळकत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे आणि ऑनलाईनद्वारे कराचा भरणा करण्याची सुविधा महापालिकेने करुन दिली आहे. ऑनलाईन कराचा भरण्याच्या सुविधेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून दिवसें-दिवस ऑनलाईन कर भरणा-यांची संख्या वाढत आहे. 22 नोव्हेंबर 2018 अखेर एक लाख 23 हजार 54 मिळकत धारकांनी 151. 28 कोटी रुपयांचा कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. ऑनलाईन कर भरणा-यांना सामान्य करातील 30 जूनअखेर 5 टक्के, 30 जूननंतर 2 टक्के सवलतीचा लाभ घेत आहेत.

ज्या मिळकतधारकांनी आजपर्यंत त्यांचे नवीन, वाढीव बांधकामाची कर आकारणी करुन घेतलेली नाही. ज्या मिळकतधारकांनी वापरात बदल केलेला आहे, अशा मिळकतधारकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह कर संकलन कार्यालयात अर्ज सादर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. मिळकत कर आकारणीचा अर्ज महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.