Pimpri : महापालिका आयुक्तांना चिकुन गुनियाची लागण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून साथीच्या आजाराने धुमाकुळ घातला असून आता या आजाराचे लोण महापालिका आयुक्तांपर्यंत पोहोचले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चिकुन गुनियाची लागण झाल्यामुळे महापालिकेकडे फिरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणार्‍या तीनही नद्यांना पूर आला होता. इंद्रायणी, मुठा आणि पवना या नद्यांमधील पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत आणि योग्य पद्धतीने न झाल्यामुळे शहरात साथीच्या आजारांना सुरुवात झाली होती. महापालिका प्रशासनाने यावर तात्काळ नियोजन न केल्यामुळे काही प्रमाणात अद्यापही शहरात साथीच्या आजाराचे रुग्ण सापडत आहेत. सप्टेंबर, आक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात तर नोंव्हेंबरमध्ये तुरळक प्रमाणात हे रुग्ण सापडत होते.

डेंग्यु, मलेरिया, चिकुन गुनिया, ताप, सर्दी यासारख्या आजाराने त्रस्त असलेले शेकडो रुग्ण महापालिकेच्या विविध रुग्णालयात आजही उपचार घेत आहेत. यातील चिकुन गुनिया या साथीच्या आजाराने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे त्रस्त असल्याचे आज समोर आले. बुधवारी होणार्‍या स्थायी समितीच्या सभेला ते उपस्थित न राहिल्याने ही बाब समोर आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.