Pimpri : ‘रिंग’मध्ये आयुक्तांचा सहभाग; स्थायी समिती सदस्याचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास कामातील निविदांमध्ये रिंग होत आहे. या ‘रिंग’मध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आर्थिक हितसंबध गुंतल्याचा आरोप करत त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य मयूर कलाटे यांनी केली आहे.

महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या निविदा सगंनमत (रींग) करुन भरल्या जात आहेत. याबाबत वेळोवेळी पुरावे देऊनही हेतुपुरस्सर काही कारवाई केली जात नाही. माझ्या प्रभागातील रस्त्याच्या कामामध्ये ठराविक तीन ठेकेदारांनी रिंग केली आहे. यात रिंग होणार असल्याची माहिती आयुक्त हर्डीकर यांना दिली होती. त्याची योग्य ती चौकशी करुन फेरनिविदा काढण्याची मागणी केली होती. मात्र, आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अहवाल देऊन सर्व ठेकेदारांना आणि संबंधित विभागाच्या अधिका-यांना ‘क्लिन’ चीट दिली. त्यांच्या अहवालामध्ये आम्ही सांगिल्याप्रमाणे त्याच ठेकेदाराला काम मिळाले आहे, असे कलाटे यांनी म्हटले आहे.

कोट्यवधी रुपयांच्या निविदा कामांमध्ये आयुक्त, त्यांच्या मर्जीतील ठराविक चार ते पाच ठेकेदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी मुद्दाम जाचक व या ठराविक ठेकेदारांना साजेशा अटी टाकतात. त्यामुळे साहजिक बाकीच्या ठेकेदार या निविदा भरु शकत नाहीत. त्यामुळे निविदेला प्रतिसाद कमी मिळून याच ठराविक ठेकेदारांना आलटून पालटून महापालिकेची कोट्यवधी रुपयांची कामे मिळत आहेत. यामध्ये संबंधित विभागाच्या अधिका-यांसह आयुक्त श्रावण हर्डीकर सुद्धा सहभागी आहेत. या ‘रिंग’मुळे महापालिकेचे पर्यायाने शहरातील नागरीकांनी कररुपी पैसा दिला आहे त्यांचे नुकसान होत आहे. कुंपणच जर शेत खात असेल. तर, तक्रार कोणाकडे करायची ? असा सवालही कलाटे यांनी उपस्थित केला.

मागील दोन वर्षातील 5 कोटी पेक्षा जास्त रकमेच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. निविदा रिंगमध्ये आर्थिक हितसंबध गुंतलेल्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांची देखील सखोल चौकशी करण्यात यावी. त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कलाटे यांनी निवेदनातून केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.