Pimpri: शहरातील जैवविविधता धोरण अन कृती आराखडा तयार करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील स्थानिक जैवविविधता धोरण तयार केले जाणार आहे. त्याचबरोबरच त्याच्या संवर्धनासाठी कृती आराखडादेखील तयार केला जाणार आहे.

याबाबतची प्राथमिक बैठक महापालिका मुख्यालयात सोमवारी (दि.1) पार पडली. यामध्ये या दोन्ही बाबींचे ठेकेदाराकडून सादरीकरण करण्यात आले. जैवविविधता समिती सभापती उषा मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आयुक्‍त श्रावण हर्डीकर, सदस्या झामाबाई बारणे, सुवर्णा बुर्डे, अनुराधा गोरखे, सहशहर अभियंता मकरंद निकम, उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता दिग्विजय पवार, अमोल देशपांडे, हेमलता अष्टेकर, ठेकेदार प्रतिनिधी अशोक जैन, डॉ. निनाद राऊत, अक्षय नाचणे, अभिजीत जगताप आदी उपस्थित होते.

शहरातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जैवविविधताप्रकल्पांतर्गत शहरासाठी लोकांची जैवविविधता नोंदवही तयार करणे, शहराच्या जैवविविधतेच्या निर्देशांकांचे मूल्यांकन करणे तसेच स्थानिक जैवविविधता धोरण आणि कृती आराखडा तयार करण्यासाठी मुंबईतील मेसर्स टेराकॅन इकोटेक प्रा. लि. या ठेकेदार संस्थेची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत अस्तित्वात असलेली जैवविविधता कशाप्रकारे जतन करावी, खासगी जागेतील जैवविविधता जतन करण्यासाठी विकास आराखडा लक्षात घेऊन,ही बाब खासगी मालकीच्या जमीनीवर कशी करता येईल, याबाबत आयुक्‍त हर्डीकर यांनी माहिती दिली. पुणे विद्यापीठाबरोबरच शहराच्या अन्य भागांमधील महाविद्यालये अथवा विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेली माहिती याकरिता उपयोगात आणली जाऊ शकते. याशिवाय सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत याकरिता कशाप्रकारे निधी उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो, यावर चर्चा झाली. तसेच जैवविविधता संवर्धनासाठी संभाजीनगरमधील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी उद्यान, तळवडे, टी ब्लॉक याठिकाणी जैवविविधता पार्क, जैवविविधता माहिती केंद्र, फुलपाखरू उद्यान, मत्स्य पैदास केंद्र अशा विविध कामांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आयुक्‍त हर्डीकर यांनी दिल्या.

समिती अध्यक्षा उषा मुंढे यांनी जैवविविधता संवर्धनासाठी विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्याची सूचना केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.