Pimpri: ‘आयुक्त श्रावण हर्डीकर, जबाब दो’, विरोधकांचा सवाल!

एमपीसी न्यूज – धरणात मुबलक पाणी असूनही नागरिकांना पुरेसे पाणी नाही, पाणीपुरवठ्याचे तीनतेरा, सर्वत्र खोदाई करून शहर खड्यात, शहरातील वाढते अतिक्रमण, बकालपणा, सर्वत्र टप-या, अनधिकृत बांधकामे, स्मार्ट सिटीत स्मार्ट एरियातच पैशांची उधळपट्टी, नियोजनाचा अभाव, वाढीव दराच्या निविदा स्वीकारणे, विविध कामांना मुदतवाढ, विविध विभागातील कामात भ्रष्टाचाराचे आरोप, राडारोड्यावरून पडल्याने नागरिकांचे बळी या सर्व गोष्टींना जबाबदार कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरे निष्क्रिय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर देतील का ? असा संतप्त सवाल विरोधी पक्षाकडून विचारला जात आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत शहराची पुरती वाट लागली आहे. सर्वत्र रस्त्यांची खोदाई केली आहे. कोणाचा काणाला ताळमेळ राहिलेला नाही. शहराला बकालपणा आल्यामुळे शहर पिछाडीवर गेले आहे. हर्डीकर यांच्या राजवटीत सर्वाधिक गडबड घोटाळे झाल्याचे आरोप होत आहेत. भाजपचे प्रवक्ते, दलाल, घरगडी, भाजपधार्जिणे अशी विरोधकांची मिळालेली शेलकी विशेषणे, थेट भ्रष्टाचारात सहभागाचे झालेले आरोप, सत्ताधाऱ्यांना सातत्याने अनुकूल भूमिका घेणे. भाजपच्या पक्ष कार्यालयात जाणे यामुळे आयुक्तांवर भाजपधार्जिणे असल्याचा शिक्का बसला आहे. आयुक्तांकडून तो शिक्का पुसण्याचा प्रयत्न देखील केला जात नाही असे दिसून येत आहे.

हर्डीकर यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामांमध्ये गैरव्यवहाराचे आरोप झाले. त्यामध्ये 425 कोटींचा रस्ते विकास, टीडीआर वाटप, वेस्ट टू एनर्जी, पंतप्रधान आवास योजना, निर्धारित मुदतीत विकासकामे पूर्ण न होणे, निगडीतील पुलासह अनेक विकासकामांना मुदतवाढ, वेळेत निविदा प्रक्रिया न राबविणे, वारंवार त्याच ठेकेदारांना मुदतवाढ देणे, निविदांमध्ये निकोप स्पर्धा होऊ न देणे, विकासकामांच्या वाढीव निविदा स्वीकारणे यामुळे आयुक्तांवर सातत्याने आरोप झाले आहेत. आयुक्त हर्डीकर यांनी याचे उत्तर देणे आवश्यक आहे.

आयुक्त कर्तव्यदक्ष, सजग, हुशार आहेत. पण, राजकीय दबाव आणि धरसोड वृत्तीमुळे ते अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत एकाही आयुक्तांवर एवढे आरोप झाले नाहीत, तेवढे हर्डीकर यांच्यावर झाले आहेत. दरम्यान, आता राज्यातील सत्ता बदलली आहे. राज्यातील सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांची आयुक्तांवर खप्पामर्जी झाली आहे. त्यामुळे त्यांची लवकरच बदली होणार असल्याचे विरोधकांकडून सांगितले जात आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेचे नगरसेवक आयुक्तांच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीवर प्रचंड नाराज आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिकेत आयुक्त असलेले श्रावण हर्डीकर यांना पिंपरी पालिकेत आयुक्त म्हणून पाठविले. 27 एप्रिल 2017 रोजी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेणारे हर्डीकर आपल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.