Pimpri: दौ-यांचा सुकाळ; आता नगरसेवक जाणार राजस्थान दौ-यावर

एमपीसी न्यूज – देशभरात सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण सुरू असतानाच राजस्थानातील गुलाबी शहर जयपूर व नजीकच्या उदयपूर महापालिकांनी राबविलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती घेण्यासाठी महापालिकेचे नगरसेवक दौ-यावर जाणार आहेत. ‘अ’ ‘इ’ आणि ‘फ’ या तीन प्रभागातीलच नगरसेवकांचा दौ-यात समावेश आहे. त्याकरिता येणा-या खर्चाच्या ऐनवेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेत नगरसेवकांच्या दौ-यांचा सुकाळ सुरु आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या आहेत. केंद्रीय पथकाकडून 4 ते 31 जानेवारीदरम्यान याचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, ‘अ’ ‘इ’ आणि ‘फ’ या तीन प्रभागातील नगरसेवकांना समिती सदस्यांना गुलाबी थंडीत गुलाबी शहर जयपूर व उदयपूर दौ-याचे वेध लागले आहेत.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाकडील प्रभाग समितीच्या प्रवास खर्च या लेखाशिर्षावर सन2018-19 सालाकरिता 75 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या दौ-याकरिता दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे सार्वजनिक वाचनालय या लेखाशिर्षासाठी केलेल्या आठ लाखांच्या तरतुदीपैकी दोन लखा रुपये खर्च जाले असून, अद्यापही 5 लाख 98 हजार रुपये शिल्लक आहे. या तरतुदीमधून दीड लाख रुपये तरतूद प्रवास लेखाशिर्षावर वर्ग करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायीला सादर करण्यात आला आहे. तर ‘अ’ आणि ‘इ’ या दोन्ही प्रभाग समित्यांच्या प्रस्तावात कोणत्याही प्रकारच्या खर्चाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

या दौऱ्यादरम्यान तीनही प्रभाग समित्यांचे सर्व नगरसेवक या दोन्ही महापालिकांच्या विविध योजना व उपक्रमांना भेट देणार आहेत. या सर्व योजनांचा अभ्यास करून , पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यापैकी कोणत्या योजनांची अंमलबजावणी करता येईल, याची चाचपणी केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.