Pimpri: महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, नगरसेवक जाणार राजस्थान दौऱ्यावर

साडेचार लाखांचा खर्च, स्थायी समितीची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 16 नगरसेवक आणि कार्यालयातील अधिकारी राजस्थानच्या चार दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. 30 जानेवारी 2020 ते 3 फेब्रुवारी 2020 दरम्यान हा दौरा आहे. या दौऱ्यात जयपूर, उदयपूर महापालिकेने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यासाठी येणाऱ्या साडे चार लाख रुपये खर्चाला स्थायी समितीने आज (बुधवारी) आयत्यावेळी मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. प्रत्येक कार्यालयाच्या हद्दीत 16 नगरसेवक येतात. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत  निगडीतील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील 16 नगरसेवक आणि अधिकारी राजस्थानच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानातील जयपूर, उदयपूर महापालिकेने राबविलेल्या कचरा विल्हेवाट, शाळांमधील स्वच्छता प्रकल्प, पर्यटन स्थळावरील स्वच्छता नियोजन इत्यादी प्रकल्पांची पाहणी करणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला प्रभाग समितीने 5 डिसेंबर 2019 रोजी मान्यता दिली होती.

दौऱ्याकामी अंदाजे होणा-या खर्चाबाबत व्हीजन हॉलिजेड यांच्याकडील 4 डिसेंबरच्या पत्रान्वये एका व्यक्तीसाठी 29 हजार 925 रुपये खर्च याप्रमाणे कोटेशन प्राप्त झाले आहे. या दौ-यासाठी होणा-या अंदाजे चार लाख 50 हजार अथवा प्रत्यक्ष होणा-या खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.