Pimpri: महापालिका थेटपद्धतीने खरेदी करणार ‘बाळंतविडा संच’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिलांना देण्यात येणारा ‘बाळंतविडा संच’ पिंपळेगुरव येथील स्पर्श ग्रुप सेवाभावी या संस्थेकडून थेटपद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे. एका बाळंतविडा संचासाठी 635 रुपये त्यांना दिले जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत महापालिका रुग्णालयात जन्म झालेल्या पहिल्या व दुसऱ्या मुलीसाठी मातेला बाळंतविडा योजनेचा फायदा दिला जातो. त्यात 1 दिवस ते 6 महिन्यांच्या बालिकेस येतील अशा कपड्यांचा संच असतो. त्यात एक फ्रॉक, दोन झबली, दोन कानटोप्या, सहा लंगोट, दोन दुपटी, प्रत्येकी एक स्वेटर, चादर, टोपी, पायमोजे आदींचा समावेश आहे.

पिंपळेगुरव येथील स्पर्श सेवाभावी संस्थेने ‘बाळंतविडा संच’ पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांनी दरपत्रक महापालिकेला सादर केले.  एक नग फ्रॉक 85 रुपये, लंगोट 16 रुपये, दुपटे 70 रुपये, झबला 29 रुपये, स्वेटर 145 रुपये, टोपी 18 रुपये, चादर 75 रुपयांत एक नग असा दर दिले आहेत. एका बाळंतविडा संचासाठी 635 रुपये त्यांना दिले जाणार आहेत. या संस्थेकडून थेट पद्धतीने संच खरेदी करण्यास महिला व बालकल्याण समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.