Pimpri: नऊ महिन्यांत महापालिकेला बांधकाम परवानगीतून 509 कोटींचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2019-20 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत बांधकाम परवानगीतून तब्बल 509 कोटी रुपयांचे भरीव उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी वर्षभरात 509 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यंदा पहिल्या नऊ महिन्यांतच 509.5  कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिने असून पुढील तीन महिन्यांत 100 ते 150 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा बांधकाम विभागाला आहे. याबाबतची माहिती स्थापत्य विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांत नवीन बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या दोन्ही बाजूंना हिंजवडी, तळवडे आयटी पार्क आहे. त्यामुळे शहरातच राहण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. शहरातील विविध भागांमध्ये नवनवे गृहप्रकल्प सुरू झाले आहेत. हक्काचे घर आणि गुंतवणूक, अशा दोन उद्देशांनी घरे खरेदी केली जात आहेत. पुनावळे, ताथवडे, वाकड भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प झाले आहेत. त्याचबरोबर मोशी, चऱ्होली परिसरातही गृहयोजना झाल्या आहेत. तसेच शहराच्या संपूर्ण भागात गृहप्रकल्प वाढले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या उत्पन्नात भर पडत आहे. चालू आर्थिक वर्षात बांधकाम विभाग सर्वाधिक उत्पन्न देणारा विभाग ठरला आहे.

याबाबत बोलताना शहर अभियंता राजन पाटील म्हणाले, ”बांधकाम परवानगी देण्याची महापालिकेची प्रक्रिया सुलभ आहे. ऑनलाईन आहे. परवानगीची प्रक्रिया जलद होते. महापालिका मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा देत आहे. त्यामुळे विकसक गुंतवणूक करत आहेत. विस्तीर्ण रस्ते, रस्त्यांचे सुशोभीकरण आहे. पर्यावरण स्वच्छ आहे. त्यामुळे शहरात राहण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. शहराच्या सर्वच भागांत गृहप्रकल्पांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या उत्पन्नात भर पडली आहे. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई वाढल्यामुळे नागरिकांचा अधिकृत घरे घेण्याकडे कल वाढला असल्याचेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.