Pimpri : शिक्षण समिती विरोधातच छडी उगारण्याची गरज; कारभारी छडी उगारणार का?

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – महापालिकेतील शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना शिक्षण समिती तालावर नाचविण्याचा प्रयत्न करत आहे. अवास्तव आणि नियमबाह्य कामे करण्यासाठी शिंदे यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. कोणतेही सदस्यपारित ठराव केला जातात. चुकीच्या कामांना साथ न दिल्यास प्रशासन अधिका-यांना बदलीची धमकी दिली जाते. त्यामुळे त्यांचे मनोधर्य खचले जात आहे. त्यासाठी महापालिकेच्या कारभा-यांनी शिक्षण समितीवर वेळीच छडी उगारण्याची गरज आहे. अन्यथा समितीची कारभार आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे.  दरम्यान, समित्याच्या विरोधात बोलणा-या राष्ट्रवादी, शिवसेनेच्या सदस्यांचा देखील आवाज ‘क्षीण’ झाला असून समितीतील सदस्यांचे ‘महागठबंधन’ झाले आहे.

महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर 2018 पासून शिक्षण समिती अस्तित्वात आली. शिक्षण विभागाच्या पहिल्या प्रशासन अधिकारी म्हणून ज्योत्स्ना शिंदे यांची पिंपरी महापालिकेत 24 मे 2018 रोजी प्रतिनियुक्तीवर बदली झाली. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढविणे, पटसंख्या वाढविणे, विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, शाळांचा दर्जा सुधारविण्याचे समितीचे कर्तव्य आहे. परंतु, समितीला ‘आर्थिक गणितां’मध्येच रस असल्याचे दिसून येते. त्यातूनच प्रशासन अधिका-यांच्या बदलीची भाषा केली जाते. महापालिकेत काम करण्याची शिंदे यांची पहिलीच वेळ आहे. त्या कर्तव्यदक्ष, सजग, हुशार, प्रामाणिक आहेत. त्यांच्या हेतुविषयी शंका नाही. त्या नियमावर बोट ठेवून काम करतात. हेच शिक्षण समितीतील पदाधिका-यांना ‘रूचले’ नाही. त्यामुळे समितीचा शिंदे यांच्यावर रोष निर्माण झाला आहे.

प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना शिक्षण समिती तालावर नाचविण्याचा प्रयत्न करत आहे. चुकीची कामे करण्यासाठी दबाव आणला जातो. कोणतेही सदस्यपारित ठराव केले जातात. चुकीच्या कामांना साथ न दिल्यास प्रशासन अधिका-यांना ‘आम्ही तुमची बदली करु’ अशी धमकी दिली जाते. त्यामुळे त्यांचे मनोधर्य खचले जात असून शिक्षण समितीत काम करण्यासाठी कोणीही राजी होत नाही. समितीकडून अवास्तव आणि नियमबाह्य कामकाजाची अपेक्षा केली जाते.

_MPC_DIR_MPU_II

चुकीच्या कामाला विरोध केल्यास सदस्यांकडून वारंवार बदलीची भाषा केली जाते. सदस्यपारित बदलीचा ठराव केला जातो. त्यामुळे काम कसे करायचे? असा सवाल प्रशासन अधिका-यांकडून केला जात आहे. शिक्षण समिती अस्तित्वात आल्यानंतर सत्ताधा-यांवर तुटून पडणारे समितीतील विरोधी पक्षांच्या सदस्यांचा आवाज ‘क्षीण’ झाला आहे. समितीतील सदस्यांचे ‘महागठबंधन’ झाले आहे. त्यामुळे विरोधी आणि सत्ताधारी एक झाल्याने शिक्षण अधिका-यांच्या पाठिशी कोणीही उभे राहत नाही.

शिंदे यांना राज्य सेवेत पाठविण्याबातचा ठराव महासभेने मंजूर केल्यानंतर (गुरुवारी)पुन्हा शिक्षण समितीने त्यांना राज्यसेवेत पाठविण्याचा ठराव आयत्यावेळी मंजूर केला आहे. महापालिकेतील सर्वोच्च सभा असलेल्या महासभेने एकदा ठराव केल्यानंतर पुन्हा कोणत्याही समितीच्या ठरावाची आवश्यकत नसते. तरीही, शिक्षण समितीने तोच ठराव मंजूर केल्याने शिक्षण समितीचे अज्ञान समोर आले आहे. त्यांची उजळणी करण्याची गरज असून समितीवर छडी उगारण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या कारभा-यांनी समितीवर वेळीच छडी उगारावी अन्यथा समितीची कारभार आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे.

शाळांऐवजी ‘फाईली’त रस

शिक्षण समितीने केलेल्या विविध ठरावाची अंमलबाजवणी करण्याचे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यानुसार प्रशासन कारवाई करत असते. समितीच्या पदाधिका-यांना शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शाळांमध्ये फिरणे आवश्यक आहे. परंतु, समितीचे पदाधिकारी शाळांमध्ये फिरण्याऐवजी ‘फाईली’ मागे फिरत असतात. अधिका-यांने फाईलवर स्वाक्षरी केली की त्यांच्या वरच्या अधिका-यांने स्वाक्षरी केल्याचे पदाधिकारीच सांगतात. त्यामुळे समितीला शाळांऐवजी ‘फाईल’ मध्येच रस असल्याचे दिसून येते.

दरम्यान, शिक्षण समितीने पती-पत्नी एकत्रीकरण, एकतर्फी सेवा वर्गीकरण अशा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा महापालिका शाळेत वर्गीकरणाचा सदस्य पारित प्रस्ताव मंजूर केला. महासभेने देखील तो प्रस्ताव मंजूर केला आहे. पदाधिका-यांनी शिक्षकांकडून दहा-दहा लाख रूपये घेतल्याचा विरोधकांचा आरोप आहे. विविध समित्या, महासभा कोणतेही सदस्यपारित ठराव करुन त्याची अमंलबजावणी करण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सदस्य पारित ठराव बंधनकारक नाहीत. त्याची अमंलबजावणी करताना अचडणी येतात. त्यामुळे विभागप्रमुखांनी सदस्यपारित ठरावाची अंमलबजावणी करु नये, असे परिपत्रकच काढले होते. तरीही, सत्ताधा-यांचा सदस्य पारित ठराव करण्याचा सपाटा सुरुच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.