Pimpri : फूल विक्रेत्यांना मिळणार हक्काची जागा; महापौरांचे मानले आभार

एमपीसी न्यूज – पिंपरी शगुन चौकातील फूल विक्रेत्यांचे क्रोमा शेजारील जागेत स्थलांतर केले जाणार आहे. त्यामुळे फूल आडत व्यापार्‍यांना आता हक्काचा बाजार उपलब्ध होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली आहे. यानिमित्त फूल आडत व्यापार्‍यांनी महापौर राहुल जाधव यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

यावेळी फूल संघटनेचे अध्यक्ष राजकुमार मोरे, पिंपरी उपबाजार प्रमुख राजू शिंदे, सचिव शिवाजी सस्ते, बाबा रासकर, बाबा तापकीर, अजित तापकीर, संतोष जाधव, अमोल राक्षे उपस्थित होते.

शगुन चौकातील रोडवर फूल बाजार भरत असल्यामुळे फूल आडत व्यापार्‍यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच सकाळी 10 वाजेपर्यंतच हा फूल व्यापार होत असल्याने शेतकर्‍यांच्या मालाला देखील योग्य अशी किंमत मिळत नाही. कवडीमोल किंमतीमध्ये हा माल विकावा लागतो. तसेच सणासुदीच्या काळात येथे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे फूल बाजारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मागील काही वर्षापासून येथील व्यापार्‍यांनी केली होती.

त्यानुसार पिंपरी येथील क्रोमाशेजारील जागा फुल मार्केटला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार तात्पुरते 30 पत्राशेडचे गाळे उभारून ते 11 महिन्याच्या भाडेतत्वावर या व्यापार्‍यांना देण्यात येणार आहे. या जागेत भविष्यात महापालिकेचे मल्टिस्टोअरेज पार्किंगची इमारत होणार असून त्या इमारतीमधील तळमजला हा फूल विक्रेत्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे फुल आडत व्यापार्‍यांना आता हक्काचे बाजार उपलब्ध होणार असून लवकरच त्यांचे नवीन जागेत पुनर्वसन होणार असल्याने व्यापार्‍यांनी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.