Pimpri : पीएमपीला 15 कोटी संचलन तूट; स्थायीची मान्यता

एमपीसी न्यूज – संचलन तूटीपोटी पीएमपीएमएलला 15 कोटी, 84 लाख 85 हजार 851 रुपये देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. ही रक्कम दोन समान हप्त्यांमध्ये अदा केली जाणार आहे.

स्थायी समितीच्या साप्ताहिक विषय पत्रिकेवर एकूण 204 कोटी 62 लाखांच्या संचलन तुटीचे अवलोकन करण्याचा विषय होता. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महापालिका हिश्‍याचे 81 कोटी 84 लाख, 85 हजार 851 रुपये पीएमपीला देणे आहे. त्यापैकी आतापर्यंत संचलन तुटीपोटी 66 कोटी रुपये दिले असून, उर्वरित 15 कोटी, 84 लाख, 85 हजार 851 रुपये अदा करण्याचा प्रस्ताव स्थायीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. ही रक्कम दोन समान हप्त्यांमध्ये अदा करण्यास स्थायीने मान्यता दिली आहे.

दरम्यान, महापौर राहुल जाधव हे पीएमपीएमएलच्या कारभारावर नाराज असून, पुन्हा पीसीएमटी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र स्थायी समितीच्या प्रस्तावाची त्यांना माहिती नसल्याने हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे समजताच त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा निदर्शनास आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.