Pimpri: पीएमपीएल अध्यक्षांना नगरसेवकांनी घेतले फैलावर

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराला दुय्यम वागणूक दिली जात आहे. पीएमपीएलसाठी पिंपरी महापालिका 40 टक्के खर्च करते. पुणे पालिकेचा केवळ 10 टक्के हिस्सा जास्त असून, तो भारही पिंपरी पालिकेने उचलून समान दर्जा मिळवा. त्यानंतरही तोडगा न निघाल्यास शहरासाठी स्वतंत्र बस वाहतूक व्यवस्था निर्माण करावी, अशा तीव्र भावना सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केल्या. तसेच प्रश्‍नांचा भडिमार करत पीएमपीएमच्या अध्यक्षा नयना गुंडे यांना धारेवर धरले. मध्यस्थी करीत महापौर राहुल जाधव यांनी पीएमपीएलसंदर्भात विशेष सभा घेण्याचे जाहीर करीत चर्चेला पूर्णविराम दिला. तसेच, 200 बस खरेदीचा विषय तहकूब करण्यात आला. महासभेसमोर 200 बस खरेदीचा विषय होता. त्यावर सर्वपक्षाच्या नगरसेवकांनी चर्चा करत पीएमपीएलवर तोंडसुख घेतले.

कोण काय म्हणाले !

राजू मिसाळ (राष्ट्रवादी काँग्रेस) – पुण्याचा महापौरांनी पत्र दिल्यानंतर 4 दिवसांत पीएमपीएलने बैठक घेतली. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनी 14 ऑगस्टला पत्र देऊनही अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही. महापौर व नगरसेवकांना न सांगता बस मार्ग बंद केले आहेत. शहरात 154 कर्मचार्‍यांचा अद्याप बदल्या रखडल्या आहेत. पुण्याचा तुलनेत पिंपरी-चिंचवडबाबत दुजाभाव केला जात आहे.

विकास डोळस (भाजप) – पीएमपीएलमध्ये शहराची 40 टक्के भागीदारी आहे. ती 10 टक्के वाढवून पुण्यासोबत समान दर्जा घ्यावा. सीमेवर कार्यालय सुरू करावे. मागील महापौर नितीन काळजे व आ. महेश लांडगेंनी दिलेल्या पत्राची दखल घेतली गेली नाही.

माजी महापौर नितीन काळजे (भाजप)- पीएमपीएलचा कारभार अत्यंत ढासळला आहे. ही स्थिती कायम राहिल्यास पीएमपीएला बंद पडले. त्यात सुधारण्यासाठी तुकाराम मुंडे सारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याची गरज आहे. महापौर व स्थायी समिती अध्यक्षांना संचालक म्हणून कमी कालावधी मिळत असल्याने नियंत्रण ठेवता येत नाही. पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडचा एका नगरसेवकांला 5 वर्षांसाठी संचालक म्हणून संधी मिळावी.

विलास मडिगेरी (भाजप) – पालिका दर महिन्यास 7 कोटी 50 लाख रूपये पीएमपीएलला देते. एसटीच्या निवृत्त अधिकार्‍यांना आर्थिक अधिकार कसे दिले गेले. महापौरांच्या पत्रांना प्रतिसाद दिला जात नाही. हा महापौरांचा अपमान आहे.

माऊली थोरात (भाजप) – शहराला खराब व नादुरूस्त बस दिल्या जातात. सध्याची परिस्थिती पाहून शहराला स्वतंत्र ओळख देण्यासाठी आणि स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाप्रमाणे स्वतंत्र बस सेवा सुरू करावी, असे भाजपचे माऊली थोरात म्हणाले.

पंकज भालेकर (राष्ट्रवादी) – जूनमध्ये पत्र देऊनही चालक व कंडक्टर नसल्याचे कारण देऊन बस मार्ग सुरू केलेला नाही. बस ब्रेकडाऊनची संख्या 60 वरून 450 वर गेली आहे. मेडिकल पॉलिसीची अट जाचक आहे.

यावर उत्तर देताना पीएमपीएमलच्या अध्यक्षा व संचालिका नयना गुंडे म्हणाल्या, “पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दुजाभाव केला जात नाही. पीएमपीएलबाबत 2 महिन्यांपूर्वी सादरीकरण केले आहे. त्यावेळी सुमारे 40 नगरसेवक उपस्थित होते. तारीख द्या, सादरीकरण केले जाईल. पुण्याचा महापौरांनी पीएमपीएलची बैठक घेतली नाही. तर, ती पालिका, वाहतूक पोलीस व पीएमपीएलची बैठक होती. नवीन मार्ग सुरू केल्यानंतर 3 महिन्यात सरासरी उत्पन्न पाहिले जाते. 30 टक्केपेक्षा कमी उत्पन्न मिळाल्यास ते मार्ग बंद केले जातात. पुण्यातील 12 व पिंपरी-चिंचवडमधील 6 मार्ग बंद केले आहेत. या पुढे महापौर व स्थायी समिती अध्यक्षांना मार्ग बंद केल्याचे कळविले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.