Pimpri: भाजपची राष्ट्रवादीवर कुरघोडी; विरोध डावलून गोंधळात क्रीडांगणाच्या नामकरणाची उपसूचना मंजूर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने विरोधकांवर कुरघोडी करत गोंधळात क्रीडांगणाच्या नामकरणाची उपसूचना मंजूर केली. शाहूनगरातील क्रीडांगणाच्या नामकरणाचा विषय न्यायप्रविष्ट असताना भाजप नगरसेवकाने सभागृहाला अंधारात ठेवत घाईगडबडीत उपसूचना मंजूर करुन घेतल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी संताप व्यक्त करत ही उपसूचना मागे घेण्याची मागणी केली. मात्र, भाजपने हा विषय रेटून नेला.

विषय पत्रिकेवरील पिंपरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्तावाला भाजप नगरसेवक केशव घोळवे यांनी शाहूनगर येथील क्रीडांगणाचे कै. सदाशिव बहिरवाडे क्रीडांगण हे नामकरण रद्द करुन त्याचे राजर्षि शाहू महाराज असे नामकरण करण्याची उपसूचना मांडली. घाईगडबडीत अर्धवट ही उपसूचना वाचण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या उपमहापौर सचिन चिंचवडे यांनीही उपसूचनेसह विनाचर्चा हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर केले. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करत सभा कामकाज रेटून नेले.

राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातील एखाद्या नगरसेवकाच्या वडिलांचे नाव क्रीडांगणाला दिले म्हणून ते रद्द करण्याची कुरघोडी करणे चुकीचे ठरेल. येथील भूमिपुत्रांनी महापालिकेच्या विकास कामांसाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यांची नावे त्याला दिली तर त्यात वावगे काही नाही. सत्ता बदलली की नामकरण करण्याची चुकीची प्रथा पाडू नका. अन्यथा पिंपरी-चिंचवडची जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले. विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक राजू मिसाळ, मोरेश्‍वर भोंडवे, अजित गव्हाणे, मयूर कलाटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, स्वीकृत सदस्य भाऊसाहेब भोईर यांनी विरोध दर्शविला.

प्रकल्पांच्या नामकरणामागे भावना असते. यापुढे नामकरणावरुन वाद होऊ नयेत यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली. दरम्यान, भाजपने प्रत्येक विषयाला उपसूचना देत उपसूचनांचा अक्षरशः पाऊस पाडला. प्रत्येक मूळ प्रस्तावासोबत एक ते दोन उपसूचना घुसडविण्यात आल्या. विशेष म्हणजे उपसूचना पूर्णपणे वाचल्या नाहीत. अर्धवट वाचलेल्या उपसूचनांना मंजुरी देण्याची खेळी महापौरांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.