Pimpri : दफनभूमीतील एकाच कामासाठी दोन निविदा प्रक्रीया; दोन्ही कामे एकाच ठेकेदाराला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदारांकडून संगनमताने महापालिकेच्या तिजोरीची कशी आर्थिक लूट केली जाते, याचा आणखी एक नमुना समोर आला आहे. दापोडीतील खिश्चन दफनभूमीत एकाच प्रकारचे काम करण्यासाठी दोन वेगवेगळ्या निविदा प्रक्रीया राबविण्यात आल्या. विशेष म्हणजे दोन्ही निविदा प्रक्रीयेत सात ते आठ ठेकेदार सहभागी होऊनही दोन्ही कामे एकाच ठेकेदाराला बहाल करण्यात आली आहेत. यामुळे निविदा प्रक्रियेबाबत संशय निर्माण होत असून, या कामांसाठी एकूण 44 लाखाचा खर्च होणार आहे. दरम्यान, यामध्ये भाजप नगरसेवकांचे हितसंबंध गुंतले असल्याची चर्चा आहे.

पिंपरी – चिंचवड शहरात 36 स्मशानभूमी आणि 5 अन्य धर्मांच्या दफनभूमी आहेत. यामध्ये एक लिंगायत, दोन खिश्चन आणि दोन मुस्लिम अशा पाच दफनभूमी आहेत. त्यापैकी दापोडी येथील खिश्चन दफनभूमी विकसित करण्यात येणार आहे. तसेच या दफनभूमीत स्थापत्यविषयक कामेही करण्यात येणार आहेत. मात्र, या एकाच प्रकारच्या कामांसाठी महापालिकेने दोन वेगवेगळ्या निविदा प्रक्रीया राबविल्या. दापोडी खिश्चन दफनभूमी विकसित करण्यासाठी प्रथम निविदा काढण्यात आली या निविदेत 29 लाख 98 हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला.

या कामासाठी सात ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. तर, या दफनभूमीत स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी काढलेल्या निविदेत 33 लाख 27 हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. या कामासाठी आठ ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. दोन्ही कामे मिळून 63 लाख 26 हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. दोन्ही कामांच्या निविदा प्रक्रीयेत श्री गुरूदेवदत्त कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने निविदा दरापेक्षा लघुत्तम दर सादर केला.

दफनभूमीची ही कामे करण्यासाठी ठेकेदाराने 29.99 टक्के कमी म्हणजेच 43 लाख 86 हजार रूपये खर्च सादर केला (63 लाख 26 हजारच्या तुलनेत) इतर ठेकेदारांपेक्षा हे दर कमी असल्याने महापालिका सहशहर अभियंता यांनी 20 नोव्हेंबर 2019 रोजी निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानुसार, त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे. मात्र, दफनभूमी विकसित करणे आणि स्थापत्यविषयक कामे करणे या कामात नेमका काय फरक आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

स्मशानभूमीचे कामही त्याच ठेकेदाराला

तर दुसरीकडे दापोडी येथील स्मशानभूमीमध्येही स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी 29 लाख 98 हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, सहा ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्येही श्री गुरूदेवदत्त कन्स्ट्रक्शन या ठेकेदारानेच निविदा दरापेक्षा लघुत्तम दर सादर केला. स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी ठेकेदाराने 29.99 टक्के कमी म्हणजेच 21 लाख 25 हजार रूपये दर सादर केला. इतर ठेकेदारांपेक्षा हे दर कमी असल्याने महापालिका सहशहर अभियंता यांनी 20 नोव्हेंबर 2019 रोजी निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानुसार, त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.