Pimpri : महापालिका करणार थेट पद्धतीने 91 लाखाची जंतुनाशक औषधे

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिका आरोग्य विभागामार्फत बॅक्टोडेक्स जंतुनाशक औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. 6 हजार 695 लिटर जंतुनाशक औषधे खरेदीसाठी 91 लाख 72 हजार 150 रूपये इतका खर्च होणार आहे. हा खर्च थेट पद्धतीने करण्यात येणार आहे.

महापालिका आरोग्य विभागाने आवश्यक बॅक्टोडेक्स जंतुनाशक औषधे खरेदी करून मिळण्यासाठी 6 हजार 695 लिटरची मागणी केलेली आहे. त्यानुसार, दुर्गंधीनाशक, जंतुनाशक किंवा बुरशीनाशक औषधे खरेदीसाठी बाजारातील वितरकाकडून दर मागविण्यात आले. हे बॅक्टोडेक्स जंतुनाशक, दुर्गंधीनाशक औषध थेट खरेदी करण्यासाठी उत्पादित कंपनी युनीलॅब केमिकल्स अ‍ॅण्ड फार्मासिटीकल्स, मुंबई यांच्याकडे 26 फेब्रुवारी 2019 नुसार विचारणा केली असता उत्पादित कंपनीने थेट पुरवठा करण्यास तयार असल्याबाबत कळविले आहे.

त्यानुसार, आरोग्य विभागास आवश्यक बॅक्टोडेक्स जंतुनाशक, दुर्गंधीनाशक औषध खरेदीसाठी बाजारातील वितरक, उत्पादीत कंपनीकडील चालू दर आणि उत्पादक कंपनीचे अधिकृत वितरक यांच्याकडील प्राप्त मंजूर दरांचा तुलनात्मक तक्ता सादर करण्यात आला.

प्राप्त दरपत्रकानुसार, मूळ किमतीची तुलना करता ही जंतुनाशक औषधे खरेदीसाठी बाजारातील वितरकाकडील प्राप्त दरापेक्षा उत्पादित कंपनीकडील दर कमी आहेत. ही औषधे उत्पादित करणारी कंपनी असल्याने आणि मुळ उत्पादित कंपनीचे दर कमी असल्याने उद्योग व उर्जा विभागाच्या दरानुसार, ही जंतुनाशक औषधे अन्य पद्धतीच्या माध्यमातून खरेदी करण्यापेक्षा एकल स्त्रोत पद्धतीने खरेदी करणे महापालिकेच्या फायद्याचे होईल.

उत्पादित कंपनी युनीलॅब केमिकल्स अ‍ॅण्ड फार्मासिटीकल्स यांच्या प्राप्त दरानुसार, 1 हजार 370 रूपये प्रतिलीटर दरानुसार 6 हजार 695 लिटर जंतुनाशक औषधे खरेदीसाठी एकूण 91 लाख 72 हजार 150 रूपये इतका खर्च थेट पद्धतीने येणार आहे. सन 2019-20 करिता मध्यवर्ती भांडार विभागाकडील जंतुनाशक, किटकनाशक, साफसफाई साहित्य आणि मशिन खरेदी या लेखाशिर्षावर 4 कोटी 50 लाख रूपये इतकी तरतुद करण्यात आली आहे.

उपलब्ध तरतुदीमधून ही औषधे खरेदी केली जाणार आहेत. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार, निविदा न मागविता थेट पद्धतीने युनीलॅब केमिकल्स अ‍ॅण्ड फार्मासिटीकल्स कंपनीकडून ही जंतुनाशक औषधे खरेदी करण्यास स्थायी समिती सभेने मंजुरी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.