Pimpri | पालिका आवारात भंडारा उधळल्याप्रकरणी महापौरांची जाहीर दिलगिरी !

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांच्या समर्थकांनी मुक्तहस्ताने भंडारा उधळला. त्यामुळे पालिकेच्या आवारात झालेल्या अस्वच्छतेबद्दल आणि नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल महापौर राहुल जाधव यांनी जाहीर माफी मागितली आहे.

आपल्या फेसबुक पेजवर त्यांनी लिहिले आहे की, शनिवारी (दि. 4) महापौरपदी माझी निवड झाल्यानंतर माझ्या हितचिंतकांनी आणि कार्यकर्त्यांनी आनंदाच्या भरात भंडारा उधळला. त्याचा अतिरेक होऊन महापालिका भवनाच्या परिसरात अस्वच्छता पसरली. अतिउत्साहाच्या भरात माझ्या मित्र परिवाराकडून झालेल्या प्रकारामुळे पालिका कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानास यापुढे कदापि तडा जाऊ देणार नाही. तसेच मी व माझ्या मित्र परिवाराकडून माझ्यावर विश्वास ठेवलेल्या भाजपाची प्रतिमा मालिन होईल असे कोणतेही कार्य यापुढे केले जाणार नाही अशी ग्वाही मी देतो असे महापौर राहुल जाधव यांनी म्हटले आहे.

शनिवारी महापौरपदाच्या निवडीनंतर उत्साही कार्यकर्त्यांनी मुक्त हाताने भंडा-यांची उधळण केल्यामुळे पालिका भंडा-यात न्हाऊन गेली. त्यातच पावसाचा शिडकावा झाल्याने भंडा-याचा चिखल झाला. त्या चिखलावरुन पडल्याने 17 ते 18 जण जायबंदी झाले. अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करत रस्ता धुवून काढावा लागला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.