Pimpri: महापालिकेच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्तापदी कुंडलिक आमले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्तापदी कुंडलिक तुकाराम आमले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमले यांना ठाणे महापालिकेतून बदलीने रुजू करण्यात आले आहे.

वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता या अभिनामाचे पद हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनावर शासन मंजूर आहे. हे पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून सध्या हे पद महापालिकेमध्ये रिक्त आहे. कुंडलिक आमले हे ठाणे महापालिकेत याच पदावर कार्यरत होते. त्यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये बदलीने नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही महापालिकेतील नियुक्त प्राधिकारी यांच्या परस्पर संमतीने ही नियुक्ती मान्य करण्यात आली आहे. या पदावरील नियुक्तीच्या अनुषंगाने वेतननिश्चितीच्या तरतूदी विचारात घेउन आमले यांचे वेतन निश्चित केले जाणार आहे.

कुंडलिक आमले यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांची ज्येष्ठता, नियुक्तीच्या दिनांकाला त्या पदाच्या सर्वात कनिष्ठ असणार आहे. या अटीच्या अधीन राहून आमले यांची राज्याच्या नगरविकास विभागातर्फे बदलीस मान्यता देण्यात आली आहे. मात्र, आमले यांच्या विनंतीनुसार ही नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे त्यांना पदग्रहण अवधी, बदली अनुदान, प्रवासभत्ता, तसेच त्या अनुषंगाने येणारे लाभ दिले जाणार नाहीत. ठाणे महापालिकेने आमले यांच्या सेवाकाळातील निवृत्तीवेतन योजना आणि सध्या अस्तित्वात असलेली सर्वसाधारण पीएफ योजनेंतर्गत जमा असलेली वर्गणी रक्कम, रजा वेतन वर्गणी आदी रक्कमा व्याजासह पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे भरणे गरजेचे आहे.

त्यानंतरच त्यांची ही सेवा पिंपरी महापालिका अस्थापनावर सामावून घेतल्याच्या आदेशाच्या दिनांकापासून धरण्यात येणार आहे. पिंपरी महापालिकेत रुजू झाल्यानंतर आमले यांना खासगी व्यवसाय महापालिका परिसर व अन्यत्र करता येणार नाहीत. कुंडलिक आमले यांना महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पदस्थापना देण्यात येत असून त्याबातचा अहवाल त्यांनी सादर करणे आवश्यक आहे. एक महिन्याची नोटीस दिल्याशिवाय किंवा एक महिन्याचे वेतन भरल्याशिवाय त्यांना या नोकरीचा राजीनामा देता येणार नाही, आदी अटी-शर्तीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना रुजू करण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.