Pimpri: स्थळपाहणी न करताच केले अंदाजपत्रक, सल्लागाराला पॅनेलवरुन काढले

एमपीसी न्यूज – रस्ता विकसित करण्याच्या कामाची स्थळपाहणी न करताच मोघम अंदाज पत्रक तयार करणा-या सल्लागाराला महापालिकेच्या पॅनेलवरुन काढण्यात आले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली आहे.

पिंपरी महापालिकेच्या सल्लागार पॅनेलवर मेसर्स आकार अभिनव यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायी समितीने या नेमणुकीला 7 फेब्रुवारी 2018 रोजीच्या आदेशान्वये मान्यता दिली आहे. प्रभाग क्रमांक 7, चऱ्होली येथील हिरामाता पूल ते खडकवासला वस्ती हा 30 मीटर डी. पी. रस्ता विकसित करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून आकार अभिनव यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु, त्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी न करता या कामाचे अंदाजपत्रक तयार केल्याचे उघड झाले.

त्यामुळे त्यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत महापालिकेने खुलासा मागविला होता. परंतु, त्यांचा खुलासा खुलासा समाधानकारक न वाटल्याने त्यांना सल्लागार पॅनलवरुन काढण्यात आले आहे.

दरम्यान, हिरामाता पूल ते खडकवासला वस्ती रस्ता विकसित करण्याच्या कामासाठी नव्याने सल्लागार नेमण्यात येणार आहे. महापालिकेने सल्लागार संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यामध्ये मेसर्स अँशुअर्ड इंजिनिअरींग सर्व्हिसेस यांनी 1.49 टक्के दर सादर केला. महापालिकेकडे प्राप्त झालेल्या एकूण प्रस्तावांपैकी त्यांचा दर लघुत्तम असल्याने आता त्यांना हे काम देण्यात येणार आहे.

अश्यूअर्ड इंजिनिअरींग सर्व्हिसेस हे महापालिकेच्या पॅनलवर आहेत. तसेच त्यांच्याकडे इतर प्रकल्पांचे काम असून त्यांचे काम समाधानकारक असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.