Pimpri : फसवणूक करणारा फरार कर्मचारी महापालिका सेवेतून बडतर्फ

एमपीसी न्यूज – नोकरीला लावण्याच्या बहाण्याने महापालिकेच्या नावे बनावट आदेश तयार करुन अधिका-याची खोटी स्वाक्षरी करुन, विनापरवाना 992 दिवस गैरहजर राहणा-या महापालिका सेवेतील फरार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाला महापालिका सेवेतून कमी केले आहे. कारणे दाखवा नोटीस बजावूनही खुलासा सादर न केल्याने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली.

चंद्रशेखर गोकुळ नार्वेकर असे महापालिका सेवेतून बडतर्फ केलेल्या कर्मचा-याचे नाव आहे. नार्वेकर हे महापालिका आस्थापनेवर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या गट क मधील पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर निगडी पोलीस स्टेशनमध्ये 9 सप्टेंबर 2015 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर ते 15 सप्टेंबरपासून विनापरवाना कामावर गैरहजर आहेत. याशिवाय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 28 मार्च 2018 रोजी त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी ते विनापरवाना गैरहजर राहत असल्याची बाब निगडी पोलिसांनी महापालिका प्रशासनाशी 12 सप्टेंबर 2018 रोजी पत्रव्यवहार करत निदर्शनास आणून दिली आहे.

नार्वेकर यांच्यावर ठेवलेले दोषारोप चौकशी अहवालात सिद्ध झाले आहेत. त्यांना संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. उलट त्यांच्याविरुद्ध विविध स्वरुपाचे फौजदारी गुन्हे दाखल होऊन, त्यांच्या बेशिस्त वर्तनात वाढच झाल्याची बाब निदर्शनास आली. याप्रकरणी विभागप्रमुखांनी नार्वेकर यांच्यावर नियमाधिन कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यांना संधी देऊनही अद्यापपर्यंत त्यांनी आपला खुलासा प्रशासनाला सादर केलेला नाही. त्यामुळे नार्वेकर फरार असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना महापालिका सेवेची गरज नसल्याचे दिसून येत असल्याने आयुक्‍त हर्डीकर यांनी त्यांना महापालिका सेवेतून कमी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.