Pimpri: महापालिका अधिकार्‍यांकडून ठेकेदाराच्या कर्मचार्‍यास अनुभव पत्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांनी चक्क ठेकेदाराच्या कर्मचा-यास अनुभव पत्र दिले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून मर्जीतील ठेकेदाराला काम देण्याचा अधिकार्‍यांचा स्वार्थ दिसून येत आहे.

महापालिकेच्या ठेकेदाराला संबंधित विभागाकडून केलेल्या कामाबाबत शिफारस पत्र देण्यात येते. परंतु, कामाची अत्यावश्यकता लक्षात घेऊन क्वचित प्रसंगी ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांना अनुभवाचे पत्र दिले जाते. महापालिकेने 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीकपात सुरू केली आहे. पाणीपुरवठा विभागाने कामाचा प्राधान्यक्रम ठरवून काम सुरू केल्याचे प्रशासन सांगत आहे. तर, दुसरीकडे पाणीपुरवठा, पंपिंग स्टेशन संचलन, मजूर पुरविणे, नवीन जलवाहिनी टाकणे, टाकी बांधणे, जलशुद्धीकरण आणि अशुद्ध जलशुद्धीकरण केंद्रातील असंख्य कामे आणि साहित्य खरेदी, या कामासह मुदतवादीच्या कामे स्थायी समितीकडून मंजूर करून घेतली जात आहे.

पाणीकपात सुरू झाल्यापासून पाणीपुरवठा विभागाने कामांचा धडाकाच लावला आहे. शहराशी आणि अत्यंत तातडीचा विषय असल्याने समितीकडून त्या कामांना बिनबोभाट मान्यता दिली जात असल्याचा फायदा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडून घेतला जात आहे. पाणीपुरवठ्याचा पंपिंग स्टेशन संचलन व दुरूस्तीची निविदा राबविली जात आहे. त्यासाठी शासकीय कामाचा अनुभव असल्याची अट आहे. त्यामुळे मर्जीतील ठेकेदाराच्या कर्मचार्‍या पालिकेच्या पाणीपुरवठा विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानी अनुभवाचे पत्र दिले आहे.

एका ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाला गेली 5 वर्षाचा कामाचा चांगला अनुभव असल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार पालिकेच्या अटी व शर्तीमध्ये बसणार आहे, असे स्पष्ट होत आहे. व्यवस्थित काम केल्यास ठेकेदाराला तसे पत्र देण्याचा नियम आहे. मात्र, अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीमुळे स्पर्धा न होता, त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळेल, अशी शंका निर्माण केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.