Pimpri: शहरात पीएमएपीएलच्या बसची संख्या वाढवा; पदाधिकाऱ्यांची सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएलच्या बसेसची संख्या वाढविण्यात यावी. बसच्या फे-या वाढवाव्यात. बंद केलेले मार्ग पुन्हा सुरू करावेत. आणखीन नवीन मार्ग सुरू करावेत, अशा सूचना महापालिकेतील पदाधिका-यांना पीएमपीएलच्या प्रशासनाला केल्या आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन तसेच पदाधिकारी यांची बैठक सोमवारी (दि. 15) चिंचवड येथील अॅटो क्लस्टर येथे पार पडली. पीएमपीएमएलशी संबंधित प्रश्नांवर पदाधिकारी, अधिका-यांनी चर्चा केली. या बैठकीला महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालिका व अध्यक्षा नयना गुंडे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, अपक्षांचे कैलास बारणे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

पीएमपीएमएलचे 178 कर्मचारी महापालिकेकडे कार्यरत होते. मात्र, पीएमपीएमएलचे तत्कालीन व्यवस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या मागणीनंतर या कर्मचा-यांना पीएमपीएमएलकडे वर्ग केले. वर्ग केलेले कर्मचारी शहरातील रहिवाशी आहेत. त्यांना पुण्यात लांब पल्याच्या बसमार्गावर काम दिले जाते. त्यामुळे त्यांची राहत्या घरापासून जवळ असलेल्या परिसरातील डेपोत बदली करण्यात यावी.

शहरात बसेसची संख्या वाढविण्यात यावी. बंद केलेले मार्ग पुन्हा सुरू करावेत. नवीन मार्ग सुरू करावेत. आगीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, देखभाल दुरूस्तीबाबत सक्षम यंत्रणा उभी करावी. डेपो सीएनजी व्यवस्थेसह अद्ययावत करावा. पीसीएमटीच्या कर्मचा-यांना दुजाभावाची वागणूक दिली जाऊ नये, अशा मागण्या नगरसेवकांनी बैठकीत केल्या.

त्यावर अध्यक्षा नयना गुंडे म्हणाल्या, “शहरातील कर्मचा-यांचा अडचणी सोडविल्या जातील. बसच्या फे-या वाढविण्यात येतील. लवकरच उपाययोजना करण्यात येतील”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.