Pimpri: वर्तुळाकार मार्गावर ट्राम, लाईटरेल, मोनोरेलची चाचपणी; महामेट्रो करणार सर्वेक्षण

महापालिका आयुक्तांचे महामेट्रोला सर्वेक्षण करण्याबाबत पत्र; अहवाल सादर करण्याची सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड हद्दीतील उच्चक्षमता द्रुतगती मार्गाचा (एचसीएमटीआर)महत्वाकांक्षी प्रकल्प महापालिका मार्गी लावणार आहे. हा प्रकल्प राबविताना सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो, लाईट रेल, ट्राम, बीआरटी की मोनोरेल यापैकी कोणता पर्याय अधिक चांगला ठरू शकतो, याचे सर्वेक्षण करण्याबाबत महामेट्रोच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांशी महापालिका प्रशासनाने पत्रव्यवहार केला आहे. हे काम ‘पीपीपी’ तत्वावर प्राधान्याने पूर्ण करावयाचे असून, या सर्वेक्षणाचा अहवाल शक्‍य तेवढ्या लवकर सादर करावा. त्यासाठी आवश्‍यक ते मानधन देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी 20 वर्षांपूर्वी “एचसीएमटीआर’ मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. तो पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि महापालिका यांच्या कक्षेत आहे. कासारवाडी, नेहरूनगर, एमआयडीसी, स्पाइन रस्ता, भक्‍ती-शक्‍ती चौक, रावेत, वाल्हेकरवाडी, काळेवाडी फाटा, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव आणि कासारवाडी असा नियोजित 30 किलोमीटर लांबीचा 30 मीटर रुंदीचा वर्तुळाकार मार्ग प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या ताब्यात 16.35 किलोमीटरचा रस्ता ताब्यात आहे.

हा ‘एचसीएमटीआर’ पुणे महापालिकेच्या विकास योजनेप्रमाणे दापोडी येथे जोडला जातो. इंग्रजीतील ‘8’ या आकड्याप्रमाणे आहे. या रस्त्यावर सार्वजनिक वाहतूक सुरू करावयाची झाल्यास ट्राम, लाईटरेल, बीआरटी अथवा मोनोरले यापैकी कोणता पर्याय योग्य ठरू शकेल. त्याचा अभ्यास करण्यात यावा. महामेट्रोस जोडणारे फिडररोड यांचा एकत्रित अभ्यास करून त्याचा अहवाल महापालिका प्रशासनाला सादर करावा, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महामेट्रोला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकल्पाबाबत महामेट्रोला अधिक माहिती हवी असल्यास महापालिकेतील कार्यकारी अभियंता देवन्ना गठ्ठ्ूवार आणि उपअभियंता संदेश खडतरे यांची नावे देण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.