Pimpri: निष्क्रिय विरोधकांमुळे चुका होऊनही तीन वर्षात भाजपच वरचढ!

भाजपच्या प्रत्यक्ष कारभाराला तीन वर्ष पूर्ण

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या प्रत्यक्ष कारभाराला आज (शनिवारी) तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. तीन वर्षाच्या कारभारादरम्यान भाजपकडून अनेक चुका झाला असताना विरोधकांनी केवळ भ्रष्टाचाराचे मोघम आरोप करत स्वहित साधून घेतले. दगडाखाली हात अडकल्याने विरोधकांना सत्ताधा-यांना कोंडीत पकडता आले नाही. त्यामुळे चुका होऊनही निष्क्रिय विरोधकांमुळे तीन वर्षात भाजपच वरचढ ठरल्याचे ठळकपणे दिसून येते. महापालिकेची निवडणूक दोन वर्षावर आली असल्याने सत्ताधा-यांना चुका टाळाव्या लागणार आहेत. तर, विरोधकांना आक्रमक, गंभीरपणे सत्ताधा-यांवर आसूड ओढावे लागणार आहेत, अन्यथा जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी 2017 मध्ये निवडणूक झाली. 23 फेब्रुवारी 2017 रोजी महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले.  महापौरपदी नितीन काळजे यांची 14 मार्च 2017 रोजी निवड झाल्यापासून भाजपच्या प्रत्यक्ष कारभाराला सुरुवात झाली. भाजपच्या कारभाराला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. सत्तेच्या त्रिकोणात मागील तीन वर्षात भाजपचे अनेक निर्णय चुकीचे, वादग्रस्त ठरले. कचरा, यांत्रिकीकरणाची निविदा, रस्ते विकास वादात सापडला. शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. सत्ताधा-यांना पाण्याचे नियोजन करता आले नाही. वर्षभरापासून शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी मिळत आहे. सत्ताधा-यांच्या चुकीमुळे पिंपरी-चिंचवडकरांवर करवाढ लादली आहे. विविध कामांबाबत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी भाजपच्या स्वपक्षातील प्रतिनिधींनीच केल्या आहेत. महासभेचे कामकाज रेटून नेले जाते. उपसूचना घुसडल्या जातात. परंतु, विरोधत मात्र सत्ताधा-यांना घेरण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसून  येत आहे.

महापालिकेत पहिल्यांदा 38 नगरसेवकांचे संख्याबळ असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात आहे. आक्रमक संघटना असलेली शिवसेना देखील नऊ नगरसेवकांसह आणि मनसे एका नगरसेवकांसह विरोधात बसले आहेत. अनुभवी नगरसेवक असल्याने विरोधक सत्ताधा-यांना सळो की पळो करुन सोडतील. सत्ताधा-यांच्या चुकांवर बोट ठेवून कोंडीत पकडतील, अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, तीन वर्षात सत्ताधा-यांना घेरण्यात विरोधक सपशेल अपयशी ठरले आहेत. विरोधकांनी केवळ नावाला भ्रष्टाचाराचे आरोप केले. परंतु, एकही प्रकरण धसास लावले नाही.  चुकीच्या कामाविरोधात न्यायालयात धाव घेतली नाही. कारण, विरोधकांचे हात दगडाखाली अडकले आहेत. विरोधकांचा ठेके घेण्यातच अधिक रस दिसून येतो.

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची सत्ता आली आहे. तरी, देखील महापालिकेत विरोधात असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवक आक्रमक भूमिका घेताना दिसून येत नाहीत. राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांमध्ये एकवाक्यता नाही. केवळ विरोध केल्याचे भासविले जाते. ठोसपणे, अभ्यासपूर्ण मुद्दे मांडत, चुका सांगत प्रबळ विरोध केलेला दिसून येत नाही. त्यामुळे चुकांवर चुका करुनही मागील तीन वर्षाच भाजपच वरचढ असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. निवडणूक अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्ताधा-यांना चुका टाळून लोकाभिमुख विकास कामे करावी लागणार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनाला सत्ताधा-यांच्या चुका, उणिवांवर बोट ठेवून आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. अन्यथा मते मागायला गेल्यावर जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.