Pimpri : महापालिका विद्यार्थ्यांना देणार नाट्यशिक्षणाचे ‘धडे’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी आता नाट्यशिक्षणाचे धडे गिरविणार आहेत. त्यासाठी सर्व शाळांमध्ये नाट्यशास्त्र तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक मानधनावर करण्यात येणार आहे. तसेच महापालिका शाळेत येणा-या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता प्राथमिक शाळेतील 100 विद्यार्थ्यांसाठी महापालिकेतर्फे वसतिगृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये बहुतेक शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गरीब घरातून, आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या, खास करून झोपडपट्टी, चाळ संस्कृतीतून येत असतात. अशा स्थितीत आपल्या महापालिका शाळांचा दर्जा खाजगी शाळांप्रमाणे अद्यायवत करण्याचा महापालिकेचा प्रयास असणार आहे.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ करण्यासाठी आणि महापालिका प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण समिती प्रयत्न करत आहे. त्यातलाच भाग म्हणून, महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये मानधनावर नाट्यशास्त्र तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास करण्यासाठी, त्यांना उज्वल भवितव्य मिळण्यासाठी या शिक्षकांचा उपयोग होणार आहे. या नाट्यशास्त्र तज्ज्ञ शिक्षकांमुळे बालवयातच या विद्यार्थ्यांना नाट्यरंगभूमीवरुन व्यासपीठ मिळणार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेची गोडी लागेल आणि महापालिका प्राथमिक शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढून विद्यार्थी पटसंख्येत देखील वाढ होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मानधनावर नाट्यशास्त्र तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

100 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह

महापालिका शाळेत येणा-या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता प्राथमिक शाळेतील 100 विद्यार्थ्यांसाठी महापालिकेतर्फे वसतिगृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिका शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांना राहण्यासाठी असलेली घरे ही छोटी आहेत. त्यामुळे जागेअभावी पालकांना चांगले शिक्षण देणे सहज शक्य होत नाही. त्याचप्रमाणे शिक्षण घेत असताना गरीबीमुळे जागेअभावी विद्यार्थ्यांना अभ्यासत अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातूनच अनेक विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे पडतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी महापालिका प्राथमिक शिक्षण विभागातर्फे 100 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.