Pimpri: पिंपरी- चिंचवड शिवसेनेत चाललयं काय ?

(गणेश यादव)

सन 2018 संपून आता लवकरच 2019 मध्ये आपण प्रवेश करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता उलथवून भाजपने मुसंडी घेत पिंपरी- चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज केली. मात्र मागील वर्षभराच्या काळात आपल्या कामामुळे भाजपचा शहरातील जनतेवर प्रभाव पडला आहे का ?, यापूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा सरस कामगिरी करीत आपल्या कार्यशैलीची चुणूक भाजपने दाखवली आहे का ? सध्या विरोधी पक्ष म्हणून असलेल्या राष्ट्रवादीला भाजपच्या कारभारावर अंकुश ठेवण्यात किती यश आले आहे ?, काँग्रेस, शिवसेना मनसे या पक्षांचे शहरातील अस्तित्व दखल घेण्याजोगे आहे का ? या सर्व बाबींवर प्रकाशझोत टाकणारी एक मालिका सुरु केली आहे. त्याचा हा चौथा लेख…..

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेतील गटबाजीमुळे पक्षाची राजकीय ताकद कमी होत आहे. दोन खासदार, एक आमदार असूनही महापालिका निवडणुकीत पक्षाचे केवळ नऊ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर देखील पक्षातील गटबाजी कमी झाली नाही. या गटबाजीला सरत्या वर्षभरात धुमारे फुटले असून त्यातूनच शहरप्रमुख, शहर संघटिका बदलण्यात आले. खासदार बारणे यांनी संघटनेतील महत्वाच्या पदावर मर्जीतील लोकांना बसवत लोकसभेची तयारी सुरु केली. परंतु, खासदार बारणे आणि महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांच्यातील राजकीय विस्तव कमी होत नाही. त्यामुळे शिवसेनेत नेमकं चाललंय तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहर शिवसेनेचे नेतृत्व दुस-या पक्षातून आलेल्या नेत्यांचा हातामध्ये असल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत. त्यातूनच शिवसेनेत अंतर्गत कलह सुरु आहे. त्याचा परिणाम, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षावर झाला. पक्षाचे पालिकेतील 14 नगरसेवकांचे संख्याबळ घटून 9 नगरसेवकांवर आले. दोन खासदार आणि एक आमदार असूनही शिवसेनेचे संख्याबळ घटल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.

महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर देखील नेत्यांनी आपल्यातील मतभेद संपविले नाहीत. त्यामुळे पक्ष संघटना कमकुवतच होत चालली आहे. आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यादृष्टीने खासदार बारणे यांनी पुन्हा मावळचा गड सर करण्यासाठी जोरदारपणे कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी सर्वप्रथम पक्ष संघटनेवर आपले वर्चस्व निर्माण केले. जवळच्या लोकांना महत्वाची पदे दिली. महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांचे पंख छाटले.

सरत्या वर्षात बारणे यांनी संघटनेत बदल घडवून आणत शहरप्रमुखपदी योगेश बाबर, मावळ जिल्हाप्रमुखपदी गजाजन चिंचवडे, शहर महिला संघटिकापदी अॅड. उर्मिला काळभोर, मावळ महिला जिल्हा संघटकपदी लोणावळा नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्या शादान चौधरी या आपल्या जवळच्या लोकांची वर्णी लावून संघटना ताब्यात घेतली. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या पिंपरी आणि चिंचवड मतदार संघातील शिवसेनेच्या कार्यकारिणीवर देखील बारणे यांचेच वर्चस्व दिसून येत आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघाची संपूर्ण माहिती असलेले ‘आपला वैभवशाली मावळ लोकसभा मतदार संघ’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाले.

खासदार श्रीरंग बारणे आणि महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यात राजकीय विस्तव जात नाही. खासदार बारणे यांचा कोणताही कार्यक्रम असो त्याला कलाटे आणि त्यांचे समर्थक नगरसेवक गैरहजर असतात. बारणे लोकसभा लढविणार आहेत. तर, कलाटे चिंचवडमधून शिवसेनेतर्फे विधानसभेची निवडणूक लढवू शकतात. परंतु, निवडणूक तोंडावर आली तरीदेखील दोघांमधील राजकीय वितुष्ट कमी होताना दिसत नाही त्याचा आगामी निवडणुकीत दोघांनाही फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या शिरुर लोकसभा मतदार संघात भोसरीचा परिसर येतो. आढळराव भोसरीव्यतिरिक्त शहरातील पक्षसंघटनेत लक्ष देत नाहीत. भोसरीतील पदाधिकारी आढळराव यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी आपल्या कट्टर समर्थक सुलभा उबाळे यांची शिरुर जिल्हा महिला संघटिकापदी वर्णी लावून घेतली आहे. खासदार आढळराव यांची लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे.

जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठविणारी संघटना अशी ओळख असलेल्या शिवसेनेचे महापालिकेत अस्तित्व नसल्यासारखी परिस्थिती आहे. शिवसेना नगरसेवकांना महापालिका सभागृहात कामाची छाप पाडता आली नाही. नऊ नगरसेवकांचे दोन गट पडले आहेत. महापालिकेतील स्मार्ट सिटीच्या संचालक पदावरुन गटनेते राहुल कलाटे व नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यामध्ये वाद सुरु असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. नेत्यांमधील मतभेदामुळे शिवसेनेची संघटना खिळखिळी झाली आहे. तरीदेखील नेत्यांना त्याचे गांभीर्य नसून त्यांच्यातील मतभेद कमी होत नाहीत. आगामी वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. नेत्यांमधील मतभेद कायम राहिल्यास त्याचा पक्षालाच फटका बसू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.