Pimpri: सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी मेहनत, कष्ट आणि जिद्दीला पर्याय नाही – महापौर जाधव

एमपीसी न्यूज – पिंपरी महापालिका नेहमीच शहरातील खेळाडूंच्या पाठीशी उभी आहे. खेळाडूंना घडवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही. शहरातील सर्व खेळाडूंना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी एक अॅप तयार करण्याचे नियोजन आहे. खेळाडूंना सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी मेहनत, कष्ट आणि जिद्दीला पर्याय नाही, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा,साहित्य,कला व सांस्कृतिक समितीच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शहरातील पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा व राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमास पद्मश्री मुरलीकांत पेटकर, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या आंतराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, रणजीपटू शंतनू सुगवेकर, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती तुषार हिंगे, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, नगरसदस्य अभिषेक बारणे, निलेश बारणे, सागर गवळी, नगरसदस्या अपर्णा डोके, अनुराधा गोरखे, आरती चौंधे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव, आर.आर.पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर यादव, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव म्हणाले, “उदयन्मुख खेळाडूंसाठी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा घेणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे. जे खेळाडू आयुष्यभर मेहनत घेतात, कष्ट करतात, प्रचंड इच्छा शक्ती मनाशी बाळगतात त्यांचाच सत्कार केला जातो.”

आंतराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत म्हणाल्या, ” प्रत्येकानी खेळ खेळला पाहिजे. खेळामुळे नवीन गोष्टी शिकण्याची कला प्राप्त होते. एकाग्रता वाढते. खेळाडू म्हणून देशाचं नेतृत्व करताना अभिमान वाटतो. खेळामुळे आपल्याला एक वेगळ जग पाहिला मिळते, मित्र मिळतात, आत्मविश्वास वाढतो, चांगली प्रतिमा निर्माण होते”

अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, “शहराचा सर्वांगीण विकास झाल्यावरच शहर स्मार्ट सिटी झाले असे म्हणता येईल. शहरातून देशाचे नेतृत्व करणारे खेळाडू निर्माण व्हावे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. फक्त शिक्षणात यशस्वी असलेलाच आयुष्यात यशस्वी होतो असे नाही. खेळाडू देखील चांगले करिअर करतात”

यावेळी पद्मश्री पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलंम्पिक जलतरणपटू निवृत्त नाईक सुभेदार मुरलीकांत पेटकर, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत, अर्जुन पुरस्कार विजेते बॉक्सर कॅप्टन गोपाल देवांग, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बॉक्सर विजय यादव, मैदानी खेळाडू स्नेहल खैरे, कुस्तीपटू मारुती आडकर, कबड्डीपटू शीतल मारणे, पुजा शेलार, नितीन घुले,शंकर काटे, संगीता सोनावणे, ट्रायलेथॉन खेळाडू सोनाली पाटील, सायकलीस्ट प्रतिमा लोणारी, मिनाक्षी शिंदे, दिपाली पाटील, मिलिंद झोडगे, प्रशांत झेंडे, कमलाकर झेंडे, गिर्यारोहक राजेश पाताडे, बुद्धिबळपटू स्वाती घाटे आदी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रपती पदक विजेते सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव, आर.आर.पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, सुधीर अस्पात, विवेक मुगळीकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर यादव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

महापालिका व खासगी शाळेतील 140 विद्यार्थी खेळाडूंना सन 2017-18 या वर्षाच्या सुमारे साडेसहा लाख रुपयांच्या क्रीडा शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.जानेवारी महिन्यात होणा-या आंतरशालेय क्रिडा स्पर्धा Teen-20 ची घोषणा करण्यात आली. तसेच या स्पर्धेचा लोगो, मॅस्कॉट व टी शर्टचे अनावरण देखील महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.