Pimpri : यंदापासून 17 क्रीडा प्रकारांसाठी ‘महापौर चषक’, डिसेंबर, जानेवारीमध्ये स्पर्धा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका व खासगी शाळांमधील खेळाडूंसाठी येत्या डिसेंबर व जानेवारी महिन्यात महापौर चषक स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. विविध 17 क्रीडा प्रकारांचा यामध्ये समावेश करण्यात येणार असून क्रीडा समितीच्या सभेत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्तरावरील विविध खेळांच्या महापौर चषक स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धा राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जात असल्यामुळे स्पर्धेसाठी येणारे खेळाडू पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील असतात. या खेळांमध्ये पिंपरी-चिंचवड परिसरातील खेळाडूंचा अत्यल्प समावेश असतो. परिणामी, शहराबाहेरील खेळाडूंवर खर्च होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील शालेय विद्यार्थी, खेळाडूंना यामध्ये अधिकाधिक सहभागी होता यावे, त्यांच्यावर खर्च व्हावा यासाठी 17 प्रकारांमध्ये महापौर चषक शालेय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.

यामध्ये फुटबॉल, हॉकी, खो खो, थ्रो बॉल, कबड्डी, योगा, बुद्धिबळ, क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केट बॉल, व्हॉलीबॉल, हॅंडबॉल, जलतरण, मैदानी खेळ (ऍथलेटिक्‍स), स्केटिंग, कराटे, कुस्ती या खेळांचा समावेश आहे. डिसेंबर 2019 व जानेवारी 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत. शहरातील विविध मैदानांवर या स्पर्धा होणार असून स्पर्धेच्या आयोजनासाठी समिती तयार करण्यात आली. यामध्ये क्रीडा अधिकारी, 2 क्रीडा पर्यवेक्षक, 1 शिक्षण मंडळ पर्यवेक्षक, 2 क्रीडा शिक्षक, 2 सी.टी.ओ.चे अधिकारी यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.