Pimpri: स्थायी समिती ठेकेदारावर मेहरबान; निविदा न मागविता थेट खरेदीला मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील बालवाडी ते आठवी आणि माध्यमिक शाळेत शिकणा-या सुमारे 50 हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन शालेय गणवेश तर दोन पीटी गणवेश मिळणार आहे. निविदा प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने खरेदी करा,  अमुकतमुक ठेकेदाराकडूनच गणवेश खरेदी करा, असा ठराव स्थायी समितीने सर्वानुमते संमत केला आहे.

महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील अंदाजे 8 हजार 354 विद्यार्थी – विद्यार्थिनींना आणि प्राथमिक शाळेतील बालवाडी ते आठवीतील विद्यार्थी – विद्यार्थिनींना शालेय पटानुसार, प्रति विद्यार्थी – विद्यार्थिंनींना दोन शालेय विद्यार्थी गणवेश आणि दोन पीटी गणवेश वाकड येथील श्री महालक्ष्मी ड्रेसेस अँड टेलरींग फर्म यांच्याकडून खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच प्रति विद्यार्थी – विद्यार्थिनींना एक स्वेटर श्री वैष्णवी महिला कॉर्पोरेशन यांच्याकडून खरेदी करण्यात येणार आहेत. मात्र, दरवर्षीप्रमाणे ही साहित्य खरेदी करताना विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच हे साहित्य शाळा सुरू होताना म्हणजेच 15 जून 2020 रोजी पुरविणे आवश्यक आहे, हे कारण पुढे करत निविदा प्रक्रीया न राबविता थेट पद्धतीने हे साहित्य खरेदी करण्याचा घाट स्थायी समितीने घातला आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यासाठी यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निविदा अटी-शर्तीनुसार, नव्याने निविदा न मागविता श्री महालक्ष्मी ड्रेसेस आणि वैष्णवी महिला कॉर्पोरेशन या पुरवठादारांकडूनच हे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची दरवाढ न करता मागील वर्षाच्या लघुत्तम दराने सन 2020-21 या वर्षासाठी यापूर्वी केलेल्या करारनाम्यानुसार, पुरवठा आदेश देऊन साहित्य खरेदी केले जाणार आहे. महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही तसेच विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशा रितीने कायदेशीर बाबी तपसून प्रशासनाने निर्णय घेण्यास मान्यता द्यावी, अशी उपसुचना देत या ऐनवेळच्या विषयाला स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.  या सदस्य ठरावातून विद्यार्थ्यांचे कमी आणि स्थायी समितीचे जास्तच ‘भले’ होणार असल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.