Pimpri : स्थायी समितीसाठी मोर्चेबांधणी; ‘या’ आठ सदस्यांची संपणार मुदत

महासभेत होणार नवीन सदस्यांची निवड; कोणाची लागणार वर्णी?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 29 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामध्ये आजी-माजी अध्यक्षांसह भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश आहे. त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची निवड येत्या महासभेत केली जाणार आहे. दरम्यान, यंदा स्थायीत निवड झाल्यास सदस्याला दोन वर्षाचा कालावधी मिळणार असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यादृष्टीने इच्छुकांनी नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे. स्थायीत जाण्यासाठी भाजप नगरसेवकांमध्ये चुरस आहे. त्यातील एकाची अध्यक्षपदी वर्णी लागणार असून पुढील दोन वर्ष तिजोरीच्या चाव्या भोसरीकरांकडे राहणार असल्याची चर्चा भाजप वर्तुळात आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. पहिल्यावर्षी ‘चिठ्ठीद्वारे’ नगरसेवक समितीच्या बाहेर पडतात. त्यानंतर दोन वर्षांचा कालावधी मिळतो. भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य समितीत आहेत. त्यातील स्थायीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी अध्यक्षा ममता गायकवाड, सागर आंगोळकर, राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ 29 फेब्रुवारीला संपणार आहे.

तर, पाच अपक्ष नगरसेवक भाजपशी संलग्न आहेत. या सदस्यांनी पाचही जणांना स्थायीत संधी मिळावी यासाठी एक वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. त्यानुसार कैलास बारणे, साधना मळेकर यांनी सदस्यपद भूषविले असून आता झामाबाई बारणे सदस्या आहेत. त्या मुदत संपण्यापूर्वी राजीनामा देतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास नीता पाडाळे किंवा नवनाथ जगताप यापैकी एकाची वर्णी लागेल. सदस्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे 20 फेब्रुवारीच्या महासभेत नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. निवडणुकीला दोन वर्षाचा कालावधी राहिला आहे. यंदा स्थायीत वर्णी लागणा-या सदस्यांना दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. पुढील वर्षी नियुक्ती झाल्यास केवळ एक वर्ष स्थायीचे सदस्यत्व मिळणार आहे. त्यामुळे भाजपकडून स्थायी समितीत सदस्य निवडताना गटातटाचा समतोल कसा साधला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे महिला की पुरुष नगरसेवकाला संधी दिली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपच्या सत्तेला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यात सत्ता वाटपाचा ‘अलिखित’ फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार नितीन काळजे, राहुल जाधव यांच्या रुपाने पहिले अडीच वर्ष महापौरपद भोसरीकडे होते. तर, आता चिंचवडच्या उषा ढोरे महापौर आहेत. मागील तीन वर्षात चिंचवडमधील ममता गायकवाड आणि भोसरीतील सीमा सावळे, विलास मडिगेरी स्थायीचे अध्यक्ष झाले. सावळे, मडिगेरी भोसरी मतदारसंघातील असले तरी तेही आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक मानले जातात. त्यातच महापौरपद देखील चिंचवडकडे आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीच्या चाव्या हाती असलेले स्थायी समितीचे अध्यक्षपद पुढील दोन वर्ष भोसरीकरांकडे जाण्याची दाट शक्यता आहे. तर, भाजपचे जुने कार्यकर्ते मावळते सभागृह नेते एकनाथ पवार हेही भोसरी मतदारसंघातीलच आहेत.

दरम्यान, सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत पाच वर्षात दरवर्षी दहा आणि अपक्ष एक अशी 55 नगरसेवकांना संधी देण्याची ‘सबब’ पुढे करत पहिल्यावर्षी सर्व 11 सदस्यांचे राजीनामे घेतले होते. परंतु, मागील वर्षीपासून त्यामध्ये बदल केला होता. गतवर्षी सदस्यांचे राजीनामे घेतले नव्हते. यंदा पुन्हा जास्तीत-जास्त नगरसेवकांना संधी देण्याचे कारण देत त्यामध्ये काही बदल करत 11 सदस्यांचे राजीनामे घेतले जातात का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.