Pimpri : स्थायीच्या नियुक्त्या लांबणीवर टाकल्याने इच्छुक ‘गॅस’वर

नाव कापले जाण्याची भीती

एमपीसी न्यूज – राज्य नेतृत्त्वाने शिफारस केलेल्या सहापैकी दोन नावांना स्थानिक भाजप नेतृत्त्वाचा विरोध असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्थायीची समिती सदस्यांच्या नियुक्त्या करण्याचे लांबणीवर टाकले. महासभा तहकूब करत नियुक्त्या जाहीर करण्याचे पुढे ढकलले. त्यामुळे नावे निश्चित असलेले सदस्य ‘गॅस’वर आहेत. त्यांना नाव कापले जाण्याची भीती सतावत आहे. आता 26 फेब्रुवारी रोजी होणा-या महासभेत स्थायीच्या नवीन आठ सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. पहिल्यावर्षी ‘चिठ्ठीद्वारे’ नगरसेवक समितीच्या बाहेर पडतात. त्यानंतर दोन वर्षांचा कालावधी मिळतो. भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य समितीत आहेत. त्यातील स्थायीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी अध्यक्षा ममता गायकवाड, सागर आंगोळकर, राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ 29 फेब्रुवारीला संपणार आहे.

सदस्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार 20 फेब्रुवारी रोजीच्या विषयपत्रिकेवर स्थायी समिती सदस्यांच्या नामनिर्देशनाचा प्रस्ताव होता. मात्र, राज्य नेतृत्त्वाने शिफारस केलेल्या सहापैकी दोन नावांना स्थानिक भाजप नेतृत्वाचा विरोध असल्याने महासभा तहकुबीचे शस्त्र उपसण्यात आले. त्यामुळे नावे निश्चित असलेले सदस्य ‘गॅस’वर आहेत. त्यांना नावात बदल होण्याची भीती सतावत आहे. आता 26 फेब्रुवारी रोजी होणा-या महासभेत सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

सत्ताधारी भाजपने सभा तहकुबीची खेळी केल्याने राष्ट्रवादीच्या इच्छुक सदस्यांमध्ये देखील धाकधूक वाढली आहे. राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक स्थायीत निवडले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.