Pimpri: स्पर्धा न झालेली 15 कोटींची निविदा, आठ कोटींचा वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समोर

राष्ट्रवादी, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

एमपीसी न्यूज – एम्पायर इस्टेट उड्डाणपुलास चिंचवडमधील लिंक रस्त्यावर उतरणे व चढण्यासाठी बांधण्यात येणा-या रॅम्पच्या 15 कोटींच्या कामात स्पर्धाच झालेली नाही. तसेच ‘वायसीएमएच’च्या नवीन इमारतीतील वाहनतळासाठी 8 कोटींचा वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समिती समोर मान्यतेसाठी ठेवला आहे. दोन्ही प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधक आक्रमक होतात की ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महापालिकेच्या वतीने एम्पायर इस्टेट उड्डाणपुलास चिंचवडमधील लिंक रस्त्यावर उतरणे व चढण्यासाठी रॅम्प उभारण्यात येणार आहे. या रॅम्पच्या तब्बल 15 कोटींच्या कामात स्पर्धाच झाली नाही. एकाच ठेकेदाराची निविदा सादर झाली असताना पुन्हा निविदा प्रक्रीया राबविण्याऐवजी त्याच ठेकेदाराला काम देण्यात येणार आहे. त्यामुळे निविदेत काळेबेरे असल्याचा संशय असून तब्बल दीड वर्षांनी निविदा स्थायीसमोर ठेवण्यात आली आहे. फेरनिविदा न केल्यामुळे आयुक्तांच्या भूमिकेविषयी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या वायसीएमएच रूग्णालयाच्या आवारात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन अकरा मजली इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या पहिल्या चार मजल्यावर वाहनतळ करण्याचे नियोजन असताना आता तळमजल्यावरही अतिरिक्त वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीव कामासाठी महापालिकेवर आठ कोटीचा बोजा पडणार आहे. दोन्ही प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही विषयांवरुन स्थायी समितीची सभा वादळी होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चुकीच्या कामांविरोधात आवाज उठविण्याचे आदेश नगरसेवकांना नुकतेच दिले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे स्थायीचे सदस्य या स्पर्धा न झालेल्या 15 कोटींच्या निविदेबाबत आणि वाढीव आठ खर्चाबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच टक्केवारीचे आरोप करुन खळबळ उडवून देणारे शिवसेनेचे सदस्य देखील याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.