Pimpri: स्वच्छता विषयक कामांचे तीन अधिकाऱ्यांकडे पर्यवेक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर एकदम चकाचक असावे, यासाठी कमालीचे आग्रही असलेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील साफसफाईच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तीन सहाय्यक आयुक्तांवर सोपविली आहे. प्रवीण अष्टीकर, चंद्रकांत इंदलकर आणि मंगेश चितळे या तीन सहाय्यक आयुक्तांनी शहरातील साफसफाईच्या कामाचे पर्यवेक्षणाचे काम करावयाचे आहे. त्याबाबतचा अहवाल आयुक्तांना सादर करावयाचा आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सहभाग घेतला आहे. त्याकरिता केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वेबसाईटवर 1250 गुणांचा समावेश असलेला अर्ज असून, तो महापालिका प्रशासनाने भरला आहे. त्याअंतर्गत शहरातील सार्वजनिक, खासगी ठिकाणी, बसथांबा, रेल्वेस्थानक, व्यावसायिक ठिकाणे, झोपडपट्टया, भाजी मंडई अशा ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

त्याकरिता केंद्र सरकारचे एक पथक महापालिका प्रशासनाने अर्जात नमूद केलेल्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. याशिवाय महापालिकेचे मोबाईल ऍप डाऊनलोड केलेली संख्यादेखील या सर्वेक्षणात विचारत घेतली जाणार आहे.

यापूर्वी सर्वेक्षणसाठी येणारे केंद्र शासनाचे पथक महापालिका प्रशासनाला पूर्वकल्पना देऊन नमूद केलेल्या ठिकाणी सर्वेक्षणसाठी येत असे. मात्र यंदा हे सर्वेक्षण 4 ते 31 जानेवारीदरम्यान केले जाणार आहे. त्यासाठी हे पथक महापालिका प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता अर्जात नमूद केलेल्या ठिकाणांना ‘सरप्राईज व्हिजीट’ देणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.