Pimpri: YCMH मधील ‘रूबी एल केअर’ पालिकेने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह घेतले ताब्यात; वेतनापोटी देणार दरमहा 53 लाख रुपये

Pimpri: PCMC take over 'Ruby Al care' in YCMH along with medical Staff; PCMC to pay Rs 53 lakh per month as a salary

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात केवळ कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार करण्यात येत असल्याने या रूग्णालयातील रूबी अल केअर हे 30 खाटांचे आयसीयू हृदयरोग युनिटही तेथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे तेथील 30 प्रोफेशनल वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर व कर्मचारी मिळून एकूण 228 जणांच्या वेतनापोटी येणारा दरमहा 53 लाखाचा खर्च महापालिका करणार आहे. त्यासाठी रूबी एल केअर यांच्यासमवेत करारनामा करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती देताना अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, कोरोनाचे देशभरात थैमान सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही दररोज कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे.

सध्या शहरात कोरोनाने 448 चा आकडा ओलांडला आहे. 13 मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

साथरोगाच्या या आपत्कालीन परिस्थितीत शहरातील नागरिकांना आवश्यक मदत करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याच उपाययोजनांचा भाग म्हणून महापालिकेने यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालय हे कोविड हॉस्पीटल म्हणून निश्चित केले आहे.

या रूग्णालयात केवळ कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. याच रूग्णालयात रूबी अल केअर सर्व्हीसेस हे 30 खाटांचे आयसीयू हदयरोग युनिट कार्यरत आहे.

कोरोनाच्या कामकाजासाठी हे युनिट तेथील कार्यरत अधिकारी, कर्मचा-यांसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे या युनिटमध्येही कोरोना बाधीत रूग्ण दाखल करता येतील.

वायसीएम रूग्णालयामार्फत 30 मार्च,  20  एप्रिल आणि 8 मे रोजी पत्राद्वारे रूबी एल केअर सर्व्हीसेस यांना येथील सर्व डॉक्टर्स आणि पॅरामेडीकल स्टाफसह 30 खाटांचे हे आयसीयू युनिट चालविण्याची आवश्यकता असल्याचे कळविण्यात आले.

त्यानुसार, रूबी एल केअर यांच्याकडील कर्मचारी वर्ग त्यांचेच आयसीयू युनिट चालविण्याकरिता त्यांना दिल्या जाणा-या वेतनावर उपलब्ध करून घेण्यात आले आहे.

 वायसीएम रूग्णालयामार्फत रूबी एल केअर यांच्याकडील डॉक्टर्स आणि पॅरामेडीकल कर्मचा-यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार 30 प्रोफेशनल वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर व कर्मचारी मिळून एकूण 228 जणांच्या  वेतनाकरिता महापालिकेमार्फत 52  लाख 62 हजार रूपये प्रति महिना रूबी एल केअर यांना देण्याबाबत त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात आला आहे.

त्यानुसार, हा विषय मान्यतेसाठी स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला होता. त्यास मान्यता मिळाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.