Pimpri: प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – प्लास्टीक बंदी असतानाही व्यावसायिक उपयोगासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या व्यावसायिकांचे प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाईची मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने राबविण्यात आली. त्याअंतर्गत संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे अठरा किलो प्लास्टिक जप्त करून वीस हजार रूपयांचा दंड वसूल केला.

क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकारी ज्योती सुतार, सुषमा कुंभार, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी.कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर.एम.भोसले, आरोग्य निरीक्षक वैभव कांचन गौडार, अंकुश झिटे व राजेंद्र उजैनवाल यांच्या पथकाने कारवाई केली.

या कारवाईस मासुळकर कॉलनी येथून प्रारंभ केला. या पथकाने अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, नेहरुनगर, देहू आळंदी रस्ता, चिखली व मोशी परिसरात सुमारे 70 व्यावसायिकांची तपासणी केली. त्यांच्याकडून सुमारे अठरा किलो प्लास्टिक जप्त करण्याबरोबरच वीस हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहराला स्वच्छ सुंदर राखण्यामध्ये सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असून त्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा. प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा असेही आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.