Pimpri: ‘व्हॉल्व्ह’गळतीकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष, हजारो लीटर पाण्याची गळती 

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचा आरोप 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरवासीय पाणी कपाताली सामोरे जात असताना दुसरीकडे पाणीपुरवठ्याच्या लाईनच्या ‘व्हॉल्व्ह’ मधून दररोज हजारो लीटर पाण्याची गळती होत आहे. याकडे पाणीपुरवठा विभागा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने केला आहे. यासाठी एक स्वतंत्र दुरुस्ती पथक नेमण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या शहरात महापालिकेकडून पाणीकपात सुरू आहे. आठवड्यातून एक दिवस प्रत्येक विभागात पाणी बंद ठेवले जाते आहे. याचे नियोजन करीत जागोजागी व्हॉल्व्ह मधून होत असलेल्या पाणी गळतीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे शहरात दररोज लाखो लीटर पाणी वाया जाते. “व्हॉल्व्ह सुरक्षा व दुरुस्ती देखभाल” याकरिता महापालिकेकडे कोणतेही ठोस धोरण नाही. तसे नियोजनही केलेले दिसून येत नाही. दररोज पाण्याची होत असलेली नासाडी, जागोजागी उंच उडत असलेले पाण्याचे फवारे हे नित्याचेच होऊन बसले आहे. याकरीता एक स्वतंत्र दुरुस्ती पथक नेमण्याची आवश्यकता असे समितीने म्हटले आहे.

समितीने शहरात सर्वच उपनगरात व प्रभागात पाहणी केली. त्यामध्ये शहरात 44 ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. 20 ठिकाणी मध्यम व कमी प्रमाणात पाणीगळती होत आहे. मुख्यतः पाणी टाकीच्या जवळील असलेल्या प्रेशर व्हॉल्व्ह मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे.

पथकामध्ये सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश घाग, सतीश देशमुख, बळीराम शेवतें, संतोष चव्हाण, विजय मुनोत, अमोल कानु, बाबासाहेब घाळी, विशाल शेवाळे,  नितीन मांडवे, जयेंद्र मकवाना, तुकाराम दहे, विजय जगताप, विभावरी इंगळे, अर्चना घाळी, अँड विद्या शिंदे यांनी काम पाहिले.

समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “व्हॉल्वच्या गळतीमुळे शहरात दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते. शुद्ध जलासाठी व त्याच्या शुद्धीकरणासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. नागरिकांच्या कररूपी पैशाची अशा पद्धतीने नासाडी होणे योग्य नाही. प्रशासनाने लक्ष घालून तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.