Pimpri: शहरातील पूरबाधित अन् झोपडपट्यांमधील महिलांना चादर, बेडशीटचा संच देणार; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागातर्फे शहरातील पूरबाधित महिला आणि घोषित, अघोषित झोपडपट्यांमधील सर्व महिलांना दोन चादर, दोन बॅरेक कंबल, दोन दरी पंजा आणि दोन बेडशीट असा संच दिला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि. 4) होणा-या स्थायी समिती समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. दरम्यान, यावरील खर्च गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या मुळा आणि पवना नदीला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापूर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या सुमारे सात हजार लोकांचे स्थलांतर करावे लागले होते.

झोपडपट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे दैनंदिन जीवनमान पूर्ववत होण्यासाठी महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत पूरबाधित तसेच शहरातील घोषित, अघोषित झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या सर्व महिलांना दररोज वापरण्यासाठी साहित्य देण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन चादर, दोन बॅरेक कंबल, दोन दरी पंजा आणि दोन बेडशीट असा संच दिला जाणार आहे. शहरात घोषित, अघोषित अशा सुमारे 71 झोपडपट्टया आहेत.

त्यासाठी त्यांच्या कुटुबियांच्या नावे असलेला फोटा पास अथवा स्वत:चे आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा द्यावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित, दि पतंगनगर गार्डन व्हयू को-ऑप हौसिंग सोसायटी लि शंशाक घाटकोपर मुंबई यांच्याकडून सरकारच्या दर करारानुसार साहित्य खरेदी केले जाणार आहे. याचा सर्व खर्च नागरवस्ती व विकास योजना विभागाकडे 2019-20 या अंदाजपत्रकातील इतर कल्याणकारी योजनेच्या उपलेखाशिर्षावरील तरतूदीमधून केला जाणार आहे.

त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्यास 31 मार्च 2020 अखेर पर्यंत योजना राबविण्यासाठी विभागातील व इतर विभागातील लेखाशिर्षावरील अखर्चित, शिल्लक तरतुदीतमधून नागरवस्ती विकास योजनेतून केला जाणार आहे. याबाबत येणा-या प्रत्यक्ष खर्चास मान्यता देण्यासाठी प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.