Pimpri: पालिका ‘अर्बन स्ट्रीट’ अंतर्गत पदपथ विकसित करणार

एमपीसी न्यूज – अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत पादचा-यांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील पदपथ विकसित करणार आहे. त्याअंतर्गत पादचा-यांना चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत. पालिकेने ‘अर्बन स्ट्रीट’चा उपक्रम हाती घेतला असून त्यासाठी आकुर्डी परिसराची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती उपअभियंता तथा बीआरटीचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली. यासाठी 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पुढील आठवड्यात 52 कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गंगानगर, आकुर्डी रेल्वे स्टेशन ते पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट हा 18 मीटर रस्ता, आकुर्डी रेल्वे स्टेशन ते रावेत बास्केट ब्रीज हा 24/ 30 मीटर रस्ता, आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गुरुद्वारा चौक 18 मीटर रस्ता आणि जगताप डेअरी ते मुठा नदीपर्यंतचा 24 मीटर रत्यावरील पदपथ विकसित करण्यात येणार आहेत. त्यानंतर भविष्यात पिंपरी, दापोडी, कासारवाडी या गर्दीच्या ठिकाणचे पदपथ विकसित करण्याचे नियोजित आहे. पादचारी नागरिकांना रस्ता उपब्ध होत नाही. अशा ठिकाणी पादचारी नागरिकांना सुरक्षा देण्याचे नियोजन आहे.

आकुर्डी परिसरात शाळा, महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. त्यासोबतच नव्याने विकसित झालेल्या रहिवासी परिसर व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात या परिसरात आहे. हा परिसर वर्दळीचा असून या भागात दिवसाला 60 ते 70 हजार विद्यार्थी, 20 ते 25 हजार कामगार, कर्मचारी अशी सुमारे सव्वा लाख नागरिकांची ये-जा असते. त्यात पादचा-यांची संख्या अधिक आहे.

अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत नागरिकांना मिळणार ‘या’ सुविधा

महापालिकेचा बीआरटी विभाग हे काम करणार आहे. 100 किलोमीटर अंतरावर पादचारी मार्ग विकसित करण्यात येणार आहेत. या पादचारी मार्गांना नो व्हेईकल झोन म्हणून आरक्षित करण्यात येणार आहे. त्यामध्ये सायकलट्रॅक, आठ ते दहा फुटांचे पदपथ, मोटार पार्किंग, लँडस्केपिंग, उद्यान, आसन व्यवस्था, वॉशरुम अशा सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच पदपथ विकसित करताना एकही झाड तोडले जाणार नसून त्याची योग्यपद्धतीने निगा राखली जाणार आहे. त्याच्यावर विद्युत रोषणाई करुन परिसर मनमोहक केला जाणार आहे. तसेच पदपथावर अतिक्रमण होऊ नये यासाठी हॉकर्स झोन निश्चित केले जाणार आहेत.

खर्च किती अपेक्षित आहे?

विकास आराखड्यानुसार या रस्त्यावर दोन-अडीच फुटांचे पदपथ आहेत. त्यामळे पादचा-यांना चालणे अवघड होते. या पार्श्वभूमीवर पादचा-यांच्या सुरक्षिततेसाठी स्मार्ट अर्बन स्ट्रीटअंतर्गत पदपथांची रुंदी वाढवून आठ ते दहा फुट केली जाणार आहे. या रस्त्यावरील वृक्षसंपदासाही कायम ठेवली जाणार आहे. दिव्यांन नागरिकांना देखील हा पदपथ सहज वापरता येईल, अशी त्याची रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे व्हीलचेअरचा वापर करणारे नागरिकही या पदपथाचा वापर करतील. पुढच्या टप्य्यात स्मार्ट टॉयलेट, सिटींग अरेंजमेंट, लँडस्केपिंग, उद्यान, वॉशरुम उभारणार आहेत. त्याचा आराखडाची निश्चित केला असून यासाठी 50 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

नो व्हेईकल झोन

चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर परिसर प्रदूषणमुक्त करण्यासाठी या परिसरातही नो व्हेईकल झोन करण्यात येणार आहे. सध्या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे भाविकांना चालणे देखील मुश्किल होते. त्यामुळे चिंचवडमधील बीआरटी पार्किंगचा वापर केल्यास हा परिसर नो व्हेईकल झोन करता येईल. त्यामुळे मंदिर परिसर प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like