Pimpri: महापालिका अग्निशमन केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

एमपीसी न्यूज – अत्यावश्यक सेवेसाठी सदैव सज्ज असणा-या महापालिकेच्या सर्व अग्निशमन केंद्रामध्ये आता अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी 93 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे.

पिंपरी – चिंचवडची लोकसंख्या सध्या 25 लाखाच्या आसपास आहे. शहरात झोपडपट्ट्यांबरोबरच दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. टोलेजंग इमारतीही शहरात आता उभ्या राहत आहेत. याशिवाय शहरातून पवना, मुळा, इंद्रायणी या तीन नद्या वाहतात. महापालिका अग्निशामक दलाचे संत तुकारामनगर येथे मुख्य केंद्र असून भोसरी, रहाटणी, प्राधिकरण, चिखली येथे उपकेंद्रे आहेत. शहरात एखादी दुर्घटना घडल्यास जिवित व वित्तहानी वाचविणे, आपत्कालीन व्यवस्थापन करणे, अग्निशमन, अग्नि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, पावसाळ्यात पूरपरिस्थिती ओढवल्यास पूरनियंत्रण आणि बचावकार्य करणे आदी विविध कर्तव्ये पार पाडावी लागतात.

24 तास अग्निशमन सेवा पुरवावी लागते. लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यापासून घरगुती स्वयंपाकाच्या सिलींडरची गळती झाल्यास ती रोखणे, विहीरीत किंवा नदीत बुडालेल्यांना बाहेर काढणे, झाडावर किंवा इमारतींवर अडकलेल्या पक्ष्याची सुटका करणे यासारख्या आपत्कालीन वर्दीसाठीही अग्निशामक दलाला सतत सुसज्ज व दक्ष रहावे लागते. त्यासाठी अत्याधुनिक बचाव, सुरक्षा साधनांची गरज भासते.

अत्यावश्यक सेवेसाठी सदैव सज्ज असणा-या महापालिकेच्या सर्व अग्निशमन केंद्रामध्ये आता अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. अग्निशामक दलाच्या संत तुकारामनगर येथील मुख्य केंद्रासह भोसरी, रहाटणी, प्राधिकरण आणि चिखली येथील उपकेंद्रांमध्येही सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेमार्फत ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या.

निविदा दर 97 लाख 92 हजार रूपये निश्चित करण्यात आला. तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी कोमटेक टेलिसोल्युशन्स कंपनीने निविदा दरापेक्षा 4.10 टक्के कमी म्हणजेच 93 लाख 91 हजार रूपये दर सादर केला. इतर ठेकेदारांपेक्षा हा दर लघुत्तम असल्याने त्यांची निविदा स्विकृत करण्यास महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी मान्यता दिली. त्यानुसार, कोमटेक टेलिसोल्युशन्स कंपनीसमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.