Pimpri : महापालिका विकणार रक्तजल; महसुली उत्पन्नात वाढ होण्याचा दावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयातील रक्तपेढीत रक्तदात्यांकडून जमा झालेले अतिरिक्त रक्तजल प्रसंगी फेकून दिले जाते. आता हे अतिरिक्त रक्तजल फेकून न देता मुंबईस्थित ‘रिलायंन्स लाईफ सायन्स’ या खासगी कंपनीला विकण्यात येणार आहे. ‘रिलायन्स’ कंपनी रक्तजलासाठी प्रतिलिटर अडीच हजार रुपये महापालिकेला मोजणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या महसुली उत्पन्नत वाढ होणार असल्याचा दावा केला जात आहे. याबाबतच्या आयत्या वेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संत तुकारामनगर येथे यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालय (वायसीएम) आहे. या रुग्णालयातील रक्तपेढी 24 तास कार्यरत असते. या रक्तपेढीद्वारे विविध शिबिरे आयोजित करून, तसेच रक्तपेढीमधून रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदात्यांकडून रक्त संकलित केले जात. त्यानंतर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांसाठी व परिसरातील अन्य रुग्णालयांना रक्त व त्यातील घटकांचा मागणीनुसार पुरवठा करण्यात येतो.

रुग्णांच्या गरजेनुसार लाल रक्तपेशी व रक्तबिंबिका हे रक्तघटक वेगळे करून विशिष्ट नियंत्रित तापमानातील शीतगृहात साठवणूक केली जाते. हे रक्तघटक वेगळे करताना व ब-याचवेळी लाल रक्तपेशी साठा उपलब्ध नसल्यामुळे रक्तदात्याने दान केलेल्या पूर्ण रक्तातून लाल रक्तपेशी वेगळ्या करून मागणीनुसार रुग्णांना उपलब्ध करून द्याव्या लागतात. परिणामी, मोठ्या प्रमाणात अतिरिक्त रक्तजलाची निर्मिती होते. हे निर्माण झालेले रक्तजल त्वरित उणे 30 अंश सेल्सियस ते उणे 80 अंश सेल्सियस या विशिष्ट तापमान नियंत्रित करणा-या शीतगृहात गोठलेल्या स्थितीत एक वर्षापर्यंत साठवणूक करता येते. गोठविलेल्या रक्तजलापासून मुदतबाह्य दिनांकाच्या अगोदर स्वयंचलित यंत्राद्वारे विघटन करून त्यापासून विविध प्रकारच्या लस निर्मिती, रक्त गोठविणाारे रक्त घटक निर्मिती, इम्युनोग्लोबुलीन इंजेक्शन, विविध मात्रांची अल्बूमीन इंजेक्शन तयार होतात.

वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्तदात्यांपासून जमा केलेल्या रक्तापासून रक्तजल वेगळे केले जाते. त्यातुन सर्व रुग्णांची मागणी पूर्ण केल्यानंतर अतिरिक्त रक्तजल पिशव्या फेकून द्याव्या लागतात. त्यामुळे हे अतिरिक्त रक्तजल मान्यताप्राप्त कंपनीला दिल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे म्हणणे आहे. म्हणून हे रक्तजल विकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी रक्तजल संकलन करणा-या मान्यताप्राप्त कंपन्यांकडून दरपत्रक मागविण्यात आले. त्यावर रिलायन्स लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, इंटास आणि नॅशनल प्लाझा फ्रँक्शन सेंटर या तीन कंपन्यांनी दरपत्रक सादर केले. त्यातही ‘रिलायंस’ने हे अतिरिक्त रक्तजल प्रतिलिटर 2500 रुपये याप्रमाणे घेणार असल्याबाबत पत्रान्वये कळविले.

एकूण प्राप्त दरपत्रकातील दरांचा विचार करता ‘रिलायंस’ कंपनीने सादर केलेला दर हा अन्य कंपनीने दिलेल्या दरापेक्षा महापालिकेच्या अधिक आर्थिक फायद्याचा असल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. रिलांयस कंपनीला रक्तजल संकलित करण्यास केंद्रीय अन्न व औषध परवाना विभागाच्या महासंचालकांनी परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या अन्न व औषध परवाना विभागाच्या सहआयुक्तांनीही ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयातील रक्तेढीतील अतिरिक्त रक्तजल प्रतिलिटर 2500 रुपये प्रमाणे रिलायन्स लाईफ सायन्सेस कंपनीला देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.