Pimpri: पालिका दीड कोटीच्या भंगाराचा करणार लिलाव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे विविध विभागाकडील जुने, निरुपयोगी असे दीड कोटी रुपयांचे भंगार आहे. भंगार निरुपयोगी झाले असून फेरवापरास अयोग्य आहे. त्यामुळे महापालिका या भंगाराचा लिलाव करणार आहे.

महापालिकेच्या नेहरुनगर व इतर ठिकाणच्या गोडाऊन येथे विनावापराचे व फेरवापर होणार नाही असे 1 कोटी 35 लाख 89 हजार 860 रुपयांचे भंगार एकत्र करुन ठेवले आहे. या भंगाराचा लिलाव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम 79 (क) नुसार महापालिकेच्या कोणत्याही स्थावर किंवा जंगम मालमत्ता विक्री करण्यास महापालिका सभेची मान्यता आवश्यक आहे. यासाठी हा ठराव विधी समिती समोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

या प्रस्तावानुसार महापालिकेचे अतिरक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक, भांडार अधिकारी व संबंधित विभागाचे शाखाप्रमुख यांची एक समिती गठीत करण्यात येणार आहे. प्रस्तावात दिलेले हे मूल्य हे बाजारभावानुसार अंदाजे देण्यात आले असून लिलावात ते वाढण्याचीही शक्‍यता आहे. यामध्ये कारवाई दरम्यान जप्त केलले साहित्य, जुने फर्निचर, इ-वेस्ट अशा गोष्टींचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.