Pimpri: ‘पालिका कर्मचाऱ्यांनी खासदारांची पत्रके वाटली असल्यास त्यांचे निलंबन करणार’

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे स्पष्टीकरण ; भोसरी अतिक्रमण कारवाई दरम्यानचा प्रकार

एमपीसी न्यूज – राजकीय दबाव जुगारुन भोसरीतील अतिक्रमणावर प्रशासनाने कारवाई केली. कारवाईच्या नोटीस सोबत खासदारांचे पत्रक पालिकेच्या कर्मचा-यांकडून वाटण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र ही पत्रके बाहेरच्या व्यक्तींनी वाटली असण्याची शक्यता आहे. अधिकारी, कर्मचा-याने ही पत्रके वाटली असतील तर ती चुकीचीच बाब आहे. त्याची चौकशी करुन संबंधित कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच आपण नागरिक आणि शहराच्या हिताचेच उपक्रम निःपक्षपातीपणे राबवित असून कोणत्याही पक्षाचे काम करत नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

भोसरी मतदार संघातील अतिक्रमण करणाऱ्यांना महापालिकेने दिलेल्या नोटीशीबरोबर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पत्रांची झेरॉक्स जोडून वाटण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. तसेच आयुक्त नागरिकांचे सेवक असूनही ते भाजपचे दलाल असल्याप्रमाणे वागत आहेत, असा घणाघात केला होता.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, प्रशासन कुणाचेही पत्र कुणालाही वाटत नाही. बाहेरच्या माणसांनी पत्रके वाटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाच्या कर्मचाऱ्याकडून पत्रक वाटले गेले असेल तर त्याची निश्चित खबरदारी घेतली जाईल. अधिका-याकडून अशी चूक झाली असेल तर ती चुकीचीच बाब आहे. त्याची चौकशी केली जाईल.

_MPC_DIR_MPU_II

‘कोणत्याही नगरसेवकाने, पदाधिकारी, आमदाराने, खासदाराने पत्र दिल्यास त्याचे नाव सांगू नये असे मी वेळोवेळी सांगितले आहे. त्या पत्राचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. अतिक्रमण काढणे, अनधिकृत बांधकाम तोडणे प्रशासनाची जबाबदारी असून आयुक्तांच्या निर्देशानुसारच सर्व कारवाया होत असतात. हे मी वारंवार कर्मचा-यांना सांगितले आहे. असे सांगूनही कुठला कर्मचारी, अधिकारी चुकीचे काम करत असेल. तर, त्याचा शोध घेण्यात येईल. त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल’ असेही हर्डीकर म्हणाले.

‘अतिक्रमण कारवाईत कोणताही भेदभाव केला नाही. प्रशासन टप्पाटप्प्याने कारवाई करत आहे. नाशिक फाटा, लांडेवाडीतील अतिक्रमणावर कारवाई केली आहे. ही कारवाई निरंतर चालू राहणार आहे. 15 ऑक्टोबरपासून कारवाई सुरु न झाल्यास निलंबनाची कारवाई करु असा इशारा अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांना दिल्या होता. अल्टीमेटम दिल्यानंतरच ही कारवाई झाली असल्याचे आयुक्त यांनी स्पष्ट केले.

‘मी कुठल्याही राजकीय पक्षाचे काम करत नाही. मी निःपक्षपातीपणे काम करत असून त्याच पद्धतीने काम करत राहणार आहे. नागरिकांच्या आणि शहराच्या हिताचेच उपक्रम, कार्यक्रम राबविणार आहे’, असेही आयुक्त हर्डीकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.