Pimpri: घंटागाडी कर्मचाऱ्यांची यंदा दिवाळी होणार गोड; महापालिका 30 हजारांचे सानुग्रह अनुदान देणार

यंदा 10 हजारांची वाढ; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील घंटागाडी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला आहे. दीड महिना अगोरदर दिवाळी सणाकरिता विशेष बाब व बक्षीस रक्कम म्हणून प्रत्येक कर्मचा-याला 30 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. स्थायी समितीच्या आज (बुधवारी) झालेल्या सभेत त्याला मान्यता देण्यात आली आहे. तसेच यंदा सानुग्रह अनुदानात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

पिंपरी महापालिकेत सुमारे 400 घंटागाडी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना अस्थापना कामगारांप्रमाणे 8.33 टक्के बोनसचा लाभ मिळत नाही. दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर महापालिका कर्मचारी महासंघाकडून या कामगारांना सानुग्रह अनुदानाची मागणी केली जाते. त्यानंतर स्थायी समितीमध्ये याबाबत निर्णय घेतला जातो.

तथापि, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांत लागण्याची शक्‍यता आहे. दिवाळीचा सण दीड महिन्यांवर आला आहे. आचारसंहिता काळात सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे स्थायी समितीच्या आजच्या सभेत सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली.

विशेष म्हणजे सन 2018-19 मध्ये दिवाळी सणाकरिता 20 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा त्यात 10 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना प्रत्येकी 30 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार असल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.