BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महापालिका कर्मचा-यांना 154 टक्के महागाई भत्ता

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या कर्मचा-याप्रमाणे महापालिका कर्मचा-यांना आता महागाई भत्ता 148 टक्क्यांऐवजी 154 टक्क्यांप्रमाणे लागू करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत संबंधित शाखाप्रमुखांना आदेश जारी केला आहे.

केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडील 8 मार्च 2019 रोजीच्या निर्णयानुसार, केंद्र सरकारच्या ज्या कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या नाहीत. त्या केंद्रीय कर्मचा-यांना 1 जानेवारी 2019 पासून 148 टक्क्यांवरून 154 टक्क्यांप्रमाणे महागाई भत्ता वाढ मंजूर केलेली आहे. महापालिका कर्मचा-यांना केंद्रीय कर्मचा-यांप्रमाणे महागाई भत्ता लागू करण्याचे धोरण 10 ऑक्टोबर 2003 रोजी महापालिका सभेने निश्चित केले आहे. त्यानुसार महापालिका कर्मचा-यांना 1 जानेवारी 2019 पासून महागाई भत्ता वाढ करणे मजूर करणे आवश्यक आहे.

महापालिका आयुक्तांनी 8 ऑक्टोबर 2018 रोजीच्या प्रस्तावानुसार महापालिका नियमित कर्मचा-यांबरोबर सेवानिवृत्त कर्मचा-यांनाही महागाई भत्ता वाढ मंजुर करण्यास मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने महापालिका कर्मचा-यांना तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांनाही केंद्र सरकारी कर्मचा-यांप्रमाणे 1 जानेवारी 2019 पासून सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतन संरचनेतील वेतन बँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतनावर मंजूर महागाई भत्ता 148 टक्क्यांऐवजी 154 टक्क्यांप्रमाणे लागू करण्यात येणार आहे.

जुलै 2019 चे वेतन आणि पेन्शन बिल 154 टक्के महागाई भत्ता विचारात घेऊन काढण्यात यावे. तसेच जानेवारी 2019 ते जून 2019 पर्यंत देय भत्त्याची थकबाकी जुलै 2019 च्या वेतन देयक किंवा पेन्शन बिलासोबत काढण्यात यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.