Pimpri: ‘पीसीएनटीडीए’चा कारभार विभागीय आयुक्तांकडे, सदाशिव खाडे यांनी हाकला 17 महिने कारभार

सरकार नवीन अध्यक्ष नेमणार कि विभागीय आयुक्तांकडेच कायम पदभार ठेवणार?; शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांची अध्यक्षपदासाठी 'फिल्डींग'

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) कारभार ‘महाविकास आघाडी सरकारने’ पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडे सोमवारी (दि.3) सोपविला आहे. भाजपचे सदाशिव खाडे यांना पदमुक्त केले आहे. 6 सप्टेंबर 2018 रोजी अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या खाडे यांनी 16 महिने 28 दिवस प्राधिकरणाचा कारभार हाकला. दरम्यान, महाविकासआघाडी सरकार नवीन लोकनियुक्त अध्यक्ष नेमणार कि विभागीय आयुक्तांकडेच कारभार कायम ठेवणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अध्यक्षपदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांनी ‘फिल्डींग’ लावण्यास सुरुवात केली आहे.

नियोजनबध्द व सर्वांगिण विकास करणे व विकसित झालेले जमिनीचे भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक,वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची 14 मार्च 1972 मध्ये स्थापना झालेली आहे. 2001 मध्ये काँग्रेसचे बाबासाहेब तापकीर यांनी ‘पीसीएनटीडीए’चे अध्यक्षपद भूषविले. त्यानंतर 2004 पासून तब्बल 14 वर्ष प्राधिकरणावर प्रशासकीय राजवट होती. काही वर्ष प्राधिकरण अध्यक्षपदाची प्रभारी जबाबदारी ही पुणे विभागीय आयुक्तच सांभाळीत होते.

तत्कालीन भाजप सरकारने 6 सप्टेंबर 2018 रोजी पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यामुळे प्रशासकीय राजवट संपुष्टात आली होती. दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झाले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारने भाजपने केलेल्या महामंडळावरील नियुक्त्या रद्द केल्या.

सदाशिव खाडे यांच्याऐवजी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे राज्य सरकारने प्राधिकरणाचा कारभार दिला आहे. विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर आता प्राधिकरणाचे अध्यक्ष असणार आहेत. याबाबतचा आदेश नगरविकास खात्याने सोमवारी (दि.3) जारी केला आहे.

दरम्यान, राज्यातील सत्ता बदल झाल्याने लेखा समितीचे अ‍ॅड. सचिन पटवर्धन, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अमित गोरखे यांचे देखील अध्यपद गेले आहे. शहरातील तीन महामंडळे गेली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.