Pimpri : करवसुलीत अपयशी ठरलेल्या 82 मुख्यलिपीक, लिपीकांवर  दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – मालमत्ताकराची नव्वद टक्के वसुली करण्यात अपयशी ठरलेल्या कर आकारणी आणि कर संकलन विभागातील 82 मुख्यलिपीक, लिपीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय एक वेतनवाढ देखील स्थगित करण्यात आली आहे. या कारवाईची नोंद लिपिकांच्या सेवा पुस्तकात केली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त व कर संकलन विभागाचे प्रमुख दिलीप गावडे यांनी ही कारवाई केली आहे.

महापालिकेच्या हद्दीतील मिळकतींना मालमत्ताकराची आकारणी केली जाते. कर संकलन विभागाकडून कर आकारणीचे काम केले जाते. मिळकतकराची 100 टक्के वसूली करण्याचा सरकारचा आदेश आहे.27 डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या बैठकीत आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी अवैध बांधकामांचा शास्तीकर वगळता निव्वळ वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याबाबत निर्देश दिले होते.

तथापि, 2017-18 या आर्थिक वर्षात कर आकारणी आणि कर संकलन विभागातील 82 मुख्य लिपीक, लिपीकांनी 31 मार्च 2018 अखेरपर्यंत नव्वद टक्के वसुलीचे उदिष्ट पूर्ण केले नाही. त्यामुळे या कर्मचा-यांना कर संकलन विभागाने कारणे दाखवा नोटीस बजविली होती. कर्मचा-यांकडून खुलासा मागविला होता. परंतु, खुलासा संयुक्तिक नव्हता.

लिपिकांनी महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाशी निगडीत नेमून दिलेल्या कामकाजामध्ये निष्काळजीपणा आणि कर्तव्यात हयगय केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे 50 ते 75 टक्क्यांपर्यंत वसुली झालेल्या 82 मुख्यलिपिक, लिपीकांवर 250 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय एक वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. या कारवाईची नोंद लिपिकांच्या सेवा पुस्तकात केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.