Pimpri: भाजप-शिवसेनेच्या कारभारावर जनतेत नाराजी; मावळमधून पार्थ पवार यांचा विजय निश्चित – नवाब मलिक

एमपीसी न्यूज – भाजप-शिवसेनेच्या कारभारावर जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचा विजय निश्‍चित होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

मलिक यांनी आज (बुधवारी) मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यानंतर पिंपरी येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टी आदी उपस्थित होते.

  • यावेळी नवाब मलिक म्हणाले की, लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा पुणे जिल्ह्यात तर तीन विधानसभा रायगड जिल्ह्यात आहेत. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ यांच्या रूपाने तरुण तडफदार उमेदवार देण्यात आला आहे. या मतदारसंघात पक्षाचे काम मोठे आहे. गेल्या वेळेस शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे होती. त्यामुळेच शिवसेनेचा विजय झाला होता. मात्र, त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज केली तर ती मते शिवसेनेच्या मतांपेक्षा जास्त होती.

यावेळेस राष्ट्रवादीची महाआघाडी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप एकत्र आहेत. भाजप, शिवसेनेच्या कारभारावर सर्वत्र प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे या मतदारसंघातून पार्थ पवार यांचा विजय निश्‍चित होणार असल्याचा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.