Pimpri: महिलांसाठी ‘ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम’ राबविण्यास स्थायीची मान्यता, योजनेवरील खर्च गुलदस्त्यात

राष्ट्रवादी, शिवसेना आणि सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकाचा विरोध

एमपीसी न्यूज – महापालिका हद्दीतील महिला, मुलींच्या ज्ञानात व कौशाल्यात वाढ व्हावी. व्यवसाय करुन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने महापालिकेमार्फत ‘पंडीत दिनदयाल उपाध्याय – महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम’ या योजनेअंतर्गत वस्तीपातळीवर 21 विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 31 मार्च 2020 ते 31 मार्च 2021 अखेरपर्यंतच्या कालावधीपर्यंतचे प्रशिक्षणाचे काम हे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत थेट पद्धतीने केले जाणार आहे. योजनेच्या धोरणास आणि प्रत्यक्ष होणा-या खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली. दरम्यान, योजनेवरील खर्च गुलदस्यात ठेवला आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकाचा विरोध डावलून हा विषय मंजूर केला आहे.

महापालिका हद्दीतील महिला, मुलींच्या ज्ञानात व कौशाल्यात वाढ व्हावी. व्यवसाय करुन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, विविध व्यवसाय कलांमध्ये महिलांनी पारंगत होऊन त्यांचे दैनंदिन जीवनात ते उपयुक्त ठरावे. या महिला सक्षमीकरणाच्या, सबलीकरणाच्या दृष्टीने महिलांसाठी कौशल्य वाढ कार्यक्रमाअंतर्गत विविध व्यवयाय पूरक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण विभागामार्फत ‘पंडीत दिनदयाल उपाध्याय – महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम’ योजना राबविण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत वस्तीपातळीवर इंटेडिअर डिझाईन, डेकोरेशन प्रशिक्षण, हेअर स्पा, म्युरल पेटींग प्रशिक्षण, समासा आर्ट प्रशिक्षण, इन्टंट फुड प्रशिक्षण, विमा सल्लागार प्रशिक्षण अशा 21 विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेच्या आयटीआयमार्फत विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याचे काम चालते. तथापि, वस्तीपातळीवरील प्रशिक्षण देण्यासाठी तयारी करणे, प्रशिक्षण निहाय आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करणे, प्रशिक्षक, प्रशिक्षीकांची नेमणूक करणे, आवश्यक मनुष्यबळाची नेमणूक, मानधन ठरविणे या कामाच्या व्यापाचा विचार करता या योजनेची अंमलबजावणी आयटीआयमार्फत तातडीने होणे शक्य नसल्याचा दावा केला आहे. त्यानुसार तातडीने योजना सुरु होण्यासाठी आणि निविदा पद्धतीने संस्था निवडीसाठी प्रदीर्घ कालाधीचा लागणार आहे.

चालु आर्थिक वर्षातील तीनच महिने राहिलेत. पुढील वर्षी सुरुवातीपासूनच योजना कार्यरत असण्याच्या दृष्टीकोनातून तसेच इच्छुक असलेली महिला प्रशिक्षणापासून वंचित राहू नये, प्रशिक्षण लवकर सुरु व्हावे. यासाठी थेट पद्धतीने प्रशिक्षणाचे काम हे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत केले जाणार आहे.

31 मार्च 2020 आणि 31 मार्च 2021 अखेरपर्यंतच्या कालावधीपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण शुल्काची विषयनिहाय 90 टक्के प्रमाणे होणारी रक्कम ही प्रशिक्षण शुल्क समजण्यात येणार आहे. त्यानुसार प्रति लाभार्थी झालेल्या प्रशिक्षणाचे शुल्क संस्थेस अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक हित साधले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या योजनेसाठीचा खर्च ‘पंडीत दिनदयाल उपाध्याय – महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम’ या उपलेखाशिर्षावर सन 2019-20 आणि सन 2020-21 या आर्थिक वर्षात उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून करावा. या योजनेसाठी लाभार्थ्यांच्या प्रतिसादानुसार प्रशिक्षणाच्या वाढीव खर्चाकामी आवश्यकतेनुसार रक्कमा वर्ग करण्यास. योजना अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत 2019-20 ते 2020-21 या अखेरपर्यंतच्या कालावधीत राबविण्यास आणि योजनेच्या अंमलबजवाणीसाठीच्या धोरणास, प्रत्यक्ष होणा-या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. योजनेवरील खर्च मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.